Gold Hallmark Scam HUID Cheating Fake Purity Certificate: सोन्याच्या दागिन्यांवरील ‘हॉलमार्क’ हे त्या दागिन्यांच्या शुद्धतेबाबतच्या सर्व शंका दूर करणारे मानले जाते. मात्र, या उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉलमार्किंग केंद्रांचे गैरप्रकार करणाऱ्या चालकांच्या वाढत्या संख्येमुळे आता या खात्रीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिक व्यवसाय मिळवण्यासाठी हॉलमार्कशी छेडछाड करणे आणि ज्वेलर्सना बेकायदेशीर कमिशन देणे, असे आरोप या चालकांवर आहेत. ज्यामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेशी तडजोड होत आहे.

उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढते दर आणि मंदावलेली मागणी यामुळे सोन्याच्या दागिन्यांची बाजारपेठ कठीण काळातून जात असताना अशा प्रकारच्या प्रथांचे प्रमाण वाढत आहे. ही समस्या लहान शहरे आणि नगरांमध्ये, विशेषतः उत्तर भारतात अधिक जास्त असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी या गोष्टीला दुजोरा दिला की, “अधिक व्यवसाय मिळवण्यासाठी विविध हॉलमार्किंग केंद्रे ज्वेलर्सना विविध प्रकारची प्रोत्साहनपर सवलत देत आहेत.” एकाच डिझाइनच्या अनेक दागिन्यांच्या नगांना समान ‘हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन’ (HUID) क्रमांक देऊन हॉलमार्कशी छेडछाड केली जाण्याच्या शक्यतेकडेही त्यांनी लक्ष वेधले. याव्यतिरिक्त, काही हॉलमार्किंग केंद्रे २०-कॅरेटच्या दागिन्यांसाठीही २२-कॅरेटची प्रमाणपत्रे जारी करत असल्याचे उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले. याबाबत फायनान्शिअल एक्सप्रेसच्या वृत्ता उल्लेख आहे.

२०२१ मध्ये बंधनकारक करण्यात आलेल्या हॉलमार्किंग प्रणालीनुसार, देशातील सुमारे १५०० अधिकृत हॉलमार्किंग केंद्रांना प्रत्येक दागिन्याचा सहा-अक्षरी ‘HUID’ क्रमांक आणि त्याचा फोटो ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सकडे सादर करणे आवश्यक आहे. जेणेकरून तो त्यांच्या संकेतस्थळावर अपलोड केला जाऊ शकेल. भारतातील हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या प्रत्येक दागिन्याची अस्सलता आणि मागोवा घेण्याची क्षमता निश्चित करणे हा HUID क्रमांकाचा उद्देश आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी सांगितले की, जर ग्राहकाला एखाद्या दागिन्याच्या शुद्धतेबद्दल शंका असेल, तर तो ग्राहक BIS पोर्टल किंवा मोबाईल ॲपवर त्याची पडताळणी करू शकतो. एकदा का HUID क्रमांक BIS प्रणालीमध्ये नोंदवला गेला की, ती प्रणाली त्या दागिन्याचा फोटो तसेच त्याचे वजन ग्रॅममध्ये दर्शवते.

ग्राहक सोडून सर्वांना फायदा

हॉलमार्किंग केंद्रांना सोन्याच्या दागिन्यांच्या एका नगासाठी सराफांकडून ७५ रुपये (किमान २०० रुपये मूल्याच्या मालासाठी) आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला हे शुल्क वाढवण्यात आले आहे. हॉलमार्किंग शुल्कातील ही वाढ जवळपास पाच वर्षांनंतर करण्यात आली, ज्या काळात या केंद्रांचा ऑपरेटिंग कॉस्ट अनेक पटींनी वाढला होता आणि यंत्रसामग्री बदलण्याची गरज निर्माण झाली होती.

तरीही, अनेक केंद्रे हॉलमार्किंगसाठी सराफांकडून कमी शुल्क आकारत आहेत किंवा मोठ्या ऑर्डर्स मिळवण्यासाठी कमिशन देत आहेत. या व्यवस्थेचा फायदा उत्पादक आणि घाऊक विक्रेत्यांना झाला, कारण त्यांना कमी शुल्क भरावे लागले. अखेरीस, या साखळीतील ग्राहकाव्यतिरिक्त इतर सर्व घटकांना याचा लाभ मिळाला.