Russia Gold Sale Rates Today : गेल्या वर्षभरात सोन्यामध्ये इतिहासातील सर्वात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. आजपर्यंत सोने सर्वात कमी अस्थिर साधन मानले जात होते. मात्र, वर्षभरातील आकडेवारी पाहिली तर हा समज आता मोडीत निघाला आहे. जानेवारी २०२६ मध्ये सोन्याने १ लाख ८०,००० हजार रुपयांचा उच्चांकी दर गाठला होता. तिथून सोने सातत्याने घसरत असून आता मोठा क्रॅश येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगात सर्वाधिक सोन्याचा साठा असलेल्या देशांमध्ये रशियाचा नंबर वरचा आहे. गेल्या ६ महिन्यात रशियाने तब्बल ४४,००० किलो सोने विकले आहे. परिणामी आगामी काळात सोने स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रशियाकडे सध्या किती सोने?

रशियन मध्यवर्ती बँकेच्या अहवालानुसार, जुलै २०२६ च्या सुरुवातीला देशाकडे ७.३४ कोटी ट्रॉय औंस (अंदाजे २,२८२ मेट्रिक टन) सोन्याचा साठा शिल्लक आहे. वर्ष २०२६ च्या सुरुवातीच्या तुलनेत हा साठा १४ लाख ट्रॉय औंस म्हणजेच जवळपास ४३.५ ते ४४ टनांनी कमी झाला आहे. सध्या रशियाकडे असलेल्या सोन्याची किंमत अंदाजे २९९ अब्ज डॉलर्स (सुमारे २५ लाख कोटी रुपये) इतके आहे.

रशिया इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं का विकतोय?

युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांमुळे रशियाची आर्थिक कोंडी होत आहे. एकीकडे युद्ध आणि दुसरीकडे देश चालवण्यासाठी सरकारला उत्पन्न कमी पडत आहे. त्यामुळे रशियाने सोने विकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, रशियाला आंतरराष्ट्रीय बाजारात सोने विकण्यास बंदी आहे. असे असूनही, रशियाने हा साठा देशांतर्गत बाजारात विकला की इतर मित्रराष्ट्रांना, हे अद्याप अस्पष्ट आहे. रशियन मध्यवर्ती बँकेने हे ४४ टन सोने नेमके कोणाला विकले, याचा खुलासा करण्यास नकार दिला आहे.

जागतिक बाजारावर आणि सोन्याच्या दरांवर काय परिणाम होणार?

बाजार तज्ज्ञांच्या मते, रशियाच्या या निर्णयाचा जागतिक बाजारातील सोन्याच्या किमतींवर तात्काळ कोणताही मोठा नकारात्मक परिणाम होणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे सध्या सोन्याचे दर केवळ एका घटकावर अवलंबून नसून इतर अनेक जागतिक घडामोडींमुळे भक्कम स्थितीत आहेत.

आज सोने-चांदीचे दर वधारले

सोन्या-चांदीच्या घसरणीला ब्रेक लागला असून सलग दुसऱ्या दिवशी मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याच्या किमतीत आज ९८० रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर आज १ लाख ४३ हजार ०१० रुपये झाला, तर २२ कॅरेटचा एक तोळा १ लाख ३१ हजार ०९३ रुपये मोजावे लागणार आहे. चादीच्या किमतीही आज २७२० रुपयांनी वाढल्या असून प्रतिकिलो चांदी २ लाख २१ हजार ३२० रुपये झाली आहे.