Gold Price Drop Today : सोन्याच्या किमतीतील सलग चौथ्या दिवशी देखील घसरण पाहायला मिळाली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या चांदीच्या घसरणीला आता अखेर ब्रेक लागला असून बाजारपेठेत संमिश्र वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी, अमेरिका-इराण शांतता चर्चा आणि आयात शुल्काचा भारतीय सराफा बाजारावर काय परिणाम झाला? सोने अजून स्वस्त होणार का? सविस्तर जाणून घ्या.
चांदीच्या घसरणीला ब्रेक
या वर्षीच्या सुरुवातील चांदीच्या किमतीने ४,००,००० रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श केला होता. मध्यपूर्वेत संघर्ष पेटल्याने चंदेरी धातूच्या किमती सातत्याने कोसळत आहेत. आज चांदी १६४० रुपयांनी स्वस्त झाल्याने प्रति किलोचा दर २,३१,८६० रुपयांवर आला आहे. गेल्या महिन्याभरात चांदीची किंमत तब्बल ३५,५३० रुपयांनी घसरली आहे. असे असले तरी वर्षभरात चांदी ११५ टक्के इतकी वधारला आहे.
सोने अजूनही महाग?
आज सोन्याच्या किमतीत ८० रुपयांची किरकोळ घसरल झाल्याने १० ग्रॅमचा भाव १,४४,७३० रुपयांवर आला आहे. महिनाभरात सोने १४,६७० रुपयांनी स्वस्त झाले आहे. पण, आठवड्यात सोनेरी धातू ११८० रुपयांनी महाग झाला आहे. वर्षभराचा विचार केला तर अजूनही सोने ४७,०१० रुपयांनी महाग आहे.
मौल्यवान धातूंचे दर का घसरत आहेत?
- इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता कराराची चर्चा सुरू झाल्याने सुरक्षित गुंतवणूक समजल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी घटली आहे.
- अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक दीर्घकाळापर्यंत व्याजदर कमी करणार नसल्याने गुंतवणूकदार रोख्यांकडे आकर्षित झाले.
- सोने-चांदी उच्च किमतीवर असल्याने अनेकांनी नफावसुली केल्यानेही किमतींवर परिणाम होत आहे.
- भारतात केंद्र सरकारने आयात शुल्क दुप्पट केल्याने सोन्याची मागणी मे महिन्यात ७० टक्केपर्यंत घटली आहे.
- औद्योगिक मागणीतील अनिश्चितता वाढल्याने चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळत आहेत.
भारतीयांची सोन्याकडे पाठ?
मे महिन्यात भारतात सोन्याच्या आयातीत तब्बल ७० टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. साधारणपणे भारतात दरवर्षी ७०० ते ९०० टन सोन्याची आयात करतो. इराण-अमेरिका संघर्षात कच्च्या तेलाचे दर भडकल्याने भारताला उच्च दरात इंधन खरेदी करावे लागत होते. याचा थेट परिणाम परकीय चलनावर होत होता. ही तूट टाळलण्यासाठी सरकारने सोन्यावरील आयात शुल्क दुप्पट केले होते. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी थांबवण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. दुसरीकडे सोन्याचे दरही जवळपास दुपटीने वाढल्याने सामान्यांच्या आवक्याबाहेर गेले होते. या सर्वांचा परिपाक म्हणजे सोन्याच्या दागिन्यांची मागणी घटली आहे.
