Gold Price Drop Prediction Market Trends And Outlook By Goldman Sachs and Bank of America: सोन्याच्या किमतीमध्ये जानेवारीतील विक्रमी उच्चांकावरून मोठी घसरण झाली आहे. यामुळे सोन्याच्या किमतीवर पुन्हा एकदा दबाव निर्माण झाला आहे. या परिस्थितीत विश्लेषकांनी इशार दिला आहे की, सोन्याच्या किमतीतील ही घसरण अद्याप संपलेलनी नाही.

जानेवारीमध्ये सोन्याची किंमत प्रति औंस ५५९५ डॉलर्सच्या या विक्रमी उच्चांकावर गेली होती. पण आता सोन्याची किंमत या उच्चांकावरून ३० पेक्षा जास्त घसरून प्रति औंस ४००० डॉलर्सच्या खाली आली आहे. या घसरणीमुळे किमती ‘ओव्हरसोल्ड’ झोनच्या जवळ पोहोचल्या असल्या तरी, त्यात भक्कम सुधारणा होईल की नाही हे निश्चित नाही.

इराण युद्धाच्या वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने सोन्यावरील दबाव वाढला आहे, ज्यामुळे महागाईची चिंता वाढली आहे. तसेच या वर्षाच्या अखेरीस यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. आपल्या ताज्या बैठकीत, फेडने तीन वर्षांत प्रथमच व्याजदर वाढवले ​​आहेत आणि गुंतवणूकदारांनाही अपेक्षा आहे की आगामी बैठकांमध्येही व्याजदर वाढवण्याचा हा कल कायम राहील.

पुढील तीन महिन्यात काय होणार?

बँक ऑफ अमेरिकाच्या अंदाजानुसार, पुढील तीन महिन्यांत सोन्याची किंमत ४००० डॉलर्सच्या खाली राहील, तर चौथ्या तिमाहीत सोन्याची सरासरी किंमत प्रति औंस ४००० डॉलर्स असेल. त्यांच्या मागणीविषयक आकडेवारीनुसार प्रमुख खरेदीदारांकडून होणाऱ्या खरेदीत वार्षिक आधारावर १६.६ टक्के घट झाली आहे. यामध्ये भारताच्या आयातीत ७७.८ टक्के घट झाली आहे, तर चीनच्या आयातीत ३९.३ टक्के वाढ झाली आहे.

दागिन्यांची मागणीही मंदावली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या तिमाहीत दागिन्यांच्या मागणीत अमेरिकेत २५ टक्के, भारतात १५ टक्के आणि चीनमध्ये २८ टक्के घट झाली आहे.

सोने घसरण्याचा धोका कायम

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या कमोडिटीज रिसर्चच्या जागतिक प्रमुख सुकी कूपर यांनी सांगितले की, गेल्या आठवड्याच्या अखेरीस जागतिक गोल्ड एक्सचेंज-ट्रेडेड प्रॉडक्ट्समधून (ETPs) पुन्हा एकदा निधीचा बहिर्वाह झाला, ज्यामुळे तुलनेने मजबूत असलेल्या गुंतवणुकीच्या मागणीचा काळ संपुष्टात आला आहे.

जरी सोने ‘ओव्हरसोल्ड’ पातळीकडे जात असले तरी, त्यात मोठी घसरण होण्याचा धोका कायम असल्याचे कूपर यांनी सावध केले. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे महागाईचा दबाव वाढत आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदार अमेरिकेच्या चलनविषयक धोरणाच्या भविष्याबद्दल पुनर्विचार करण्यास प्रवृत्त होत आहेत.

सोन्यासाठी २०२७ कसे असेल?

अल्पकालीन अडथळे असूनही स्टँडर्ड चार्टर्डला सोन्याच्या बाबतीत दीर्घकाळात आशावादी दृष्टिकोन कायम आहे. बँकेच्या अंदाजानुसार चौथ्या तिमाहीत सोन्याची सरासरी किंमत प्रति औंस ४६५० डॉलर्स असेल आणि २०२७ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत ती ४८५० डॉलर्सपर्यंत पोहोचेल.

बँक ऑफ अमेरिकालाही अपेक्षा आहे की, पुढील वर्षी सोन्याच्या किमती पुन्हा सावरतील. बँकेच्या अंदाजानुसार २०२७ च्या पहिल्या तिमाहीत सोन्याची किंमत प्रति औंस ४७५० डॉलर्स असेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत ती वाढून ५००० डॉलर्सवर पोहोचेल.

सोने ५४०० डॉलर्सच्या वर जाणार?

गोल्डमन सॅक्सचा दीर्घकालीन दृष्टिकोनही काहीसा असाच आहे. सप्टेंबर महिन्यात बँकेने २०२६ च्या अखेरीसाठीचे आपले प्राईस टार्गेट कमी करून ४६५० डॉलर्स केले, परंतु २०२७ साठी ५४०० डॉलर्सचा अंदाज कायम ठेवला आहे.