Gold Silver Price : जागतिक कमोडिटी मार्केटमधून आज एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली असून भाव थेट दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. अमेरिकन डॉलरची वाढलेली ताकद आणि शांतता चर्चा सुरू असताना अमेरिकेने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यांमुळे जागतिक बाजारपेठेला धक्का बसला आहे. या घडामोडींमुळे महागाई वाढण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली आहे. फेड रिझर्व्ह व्याजदर चढेच ठेवण्याची शक्यता निर्माण झाल्याचा थेट परिणाम मौल्यावन धातूंच्या किमतीवर झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील ताजे दर

बकरीदनिमित्त गुरुवार २८ मे रोजी भारतीय कमोडिटी मार्केट बंद असले, तरी जागतिक बाजारात सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोने १.१% नी घसरून ४,४०६.८१ डॉलर प्रति औंस या २७ मार्चनंतरच्या सर्वात नीचांकी पातळीवर आले. तर जून डिलिव्हरीसाठीचा अमेरिकन सोन्याचा वायदा ०.९% घसरून ४,४०४.९० डॉलरवर आला. सोन्यापाठोपाठ चांदीवरही मोठा दबाव दिसला. स्पॉट चांदी १.७% कोसळून ७३.३४ डॉलर प्रति औंस वर आली आहे.
(टीप: आंतरराष्ट्रीय बाजारात १ औंस म्हणजेच साधारण २८.३४ ग्रॅम वजनाचे परिमाण वापरले जाते.)

सोने-चांदी घसरण्याचे मुख्य कारण

बुलियन मार्केटमधील या मोठ्या घसरणीमागे मुख्य कारण अमेरिकन डॉलर आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे इतर चलनांचा वापर करणाऱ्या परदेशी खरेदीदारांसाठी सोने खरेदी करणे महाग झाले आहे. अशात अमेरिकेने इराणवर पुन्हा हल्ला केल्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या तणावामुळे आशियाई बाजारात कच्चे तेल २% ने महागल्याने ऊर्जा क्षेत्रातून पुन्हा महागाई वाढण्याची चिंता वाढली आहे.

फेडरल रिझर्व्हचा इशारा

सर्वसाधारणपणे जागतिक संकट काळात सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जाते आणि सोन्याची मागणी वाढते. मात्र, सध्याची परिस्थिती वेगळी आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढण्याचा धोका वाढला आहे, ज्यामुळे जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून व्याजदर कपातीची असलेली अपेक्षा धूसर झाली आहे.

गुंतवणूकदारांची नफावसुली

अमेरिकेच्या केंद्रीय बँक ‘फेडरल रिझर्व्ह’च्या गव्हर्नर लिसा कुक यांनी बुधवारी स्पष्ट केले की, सध्याच्या परिस्थितीत अल्पकालीन व्याजदर स्थिर ठेवणेच योग्य ठरेल. तसेच त्यांनी असा इशाराही दिला की, नवीन टॅरिफ, इराण वाद आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील वाढत्या गुंतवणुकीमुळे किमतींवर प्रचंड दबाव येत आहे. गरज पडल्यास फेडरल रिझर्व्ह आगामी काळात व्याजदर वाढवण्यावरही विचार करू शकते. या इशाऱ्यामुळे सोन्यातील गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले आहे.

भारतीय सराफा बाजारात काय स्थिती?

गुरुवार, २८ मे रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीचे भाव स्थिर राहिले. दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात कोणताही बदल झाला नाही. देशात २४-कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,५६,४३० रुपयांना विकले जात आहे, तर २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४३,३९४ रुपये नोंदवला गेला. त्याच वेळी, १ किलो चांदी २,६६,६९० रुपयांना विकली जात आहे.