Gold Rate Crashing due to Donald Trump Iran Peace Treaty Revoked: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा तात्पुरता शांतता करार ‘संपल्याचे’ जाहीर केल्यानंतर बुधवारी सोन्याचे दर १ टक्क्यांहून अधिक कोसळले. ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे तेलाचे भाव वधारले असून, महागाई आणि अमेरिकेतील व्याजदर वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. आज सुरुवातीला २ जुलै नंतरच्या नीचांकी पातळीवर घसरण झाल्यानंतर ‘स्पॉट गोल्ड’चा (तत्काळ वितरणासाठी उपलब्ध असलेले सोने) भाव १.०२ टक्क्यांनी घसरून ४,०६३.६७ डॉलर्स प्रति औंस झाला.
“अल्प कालावधीत सोन्याचे भाव एकाच पातळीवर स्थिर राहण्याची शक्यता आहे. सोन्याचे भाव वाढण्यासाठी, अमेरिकेतील रोजगारविषयक आकडेवारी आणखी कमकुवत होणे आणि महागाईचे दर कमी होणे आवश्यक आहे. जेणेकरून धोरणात्मक निर्णयांबाबत ‘फेड’च्या अधिकाऱ्यांची भूमिका कठोर राहणार नाही”, असे यूबीएसचे विश्लेषक जिओव्हानी स्टॉनोव्हो यांनी सांगितले.
पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव पुन्हा वाढल्याने तेलाच्या किमती वधारल्या. यात ‘डब्ल्यूटीआय’ आणि ‘ब्रेंट’ क्रूडचे भाव २.५ टक्क्यांहून अधिक वाढून प्रति बॅरल ७६.०७ डॉलर्सवर पोहोचले आहेत.
‘सीएमई फेडवॉच’ टूलच्या आकडेवारीनुसार, बाजाराचा असा अंदाज आहे की सप्टेंबरमध्ये अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता ६६% आहे. मंगळवारी ही शक्यता ६२% इतकी होती.
दरम्यान, चीनच्या मध्यवर्ती बँकेने मंगळवारी जाहीर केले की, जून महिन्यात त्यांच्या सोन्याच्या साठ्यात गेल्या अडीच वर्षांतील सर्वाधिक मासिक वाढ झाली आहे.
इतर धातूंचा विचार करता, स्पॉट चांदीचे भाव २.३७% नी घसरून ५८.५९ डॉलर्स प्रति औंस झाले, प्लॅटिनमचे भाव जवळपास ३% नी घसरून १,५९१.८८ डॉलर्सवर आले आणि पॅलेडियमचे भाव ३.९% नी घसरून १,२२७.१८ डॉलर्सवर आले.
भारतातील सोन्याचे दर
बुधवारी भारतातील किरकोळ बाजारात सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण झाली. GoodReturns.in च्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर ७७० रुपयांनी घसरून १,४४,४९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. त्याचप्रमाणे, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घट झाली असून, ते अनुक्रमे ७०० रुपये आणि ५७० रुपयांनी कमी होऊन १,३२,४५० रुपये आणि १,०८,३७० रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहेत. गेल्या चार दिवसांत २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे २,५१० रुपयांची घट झाली आहे.
