Today Gold Silver Price MCX Crash : गेल्या आठवड्यातील तेजीनंतर सोने-चांदीच्या किमती घसरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका व्हिडीओनंतर त्यात आणखी भर पडली आहे. पीएम मोदी यांनी सोमवारी देशातील जनतेला कामाशिवाय सोने खरेदी करू नये, असं आवाहन केलं होतं. या आवाहनाचे थेट पडसाद आज भारतीय सराफा बाजारात तसेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) उमटल्याचे पाहायला मिळत आहे. १ सप्टेंबर २०२६ रोजी वायदा बाजारात (MCX) सोन्याच्या दरात घसरण झाली असून, सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठे चढ-उतार नोंदवले गेले आहेत.
आज सोन्या-चांदीचे भाव काय?
बुलियन वेबसाईटनुसार, २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम सोन्याच्या किमतीत आज २२० रुपयांची किरकोळ घसरण झाली. यानंतर १ तोळा सोन्याचा भाव १ लाख ५४ हजार ६९० रुपयांवर आला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर १ लाख ६२ हजार रुपयांच्या पार गेले होते. म्हणजेच आठवड्यात किमती जवळपास ८ हजार रुपयांनी कोसळल्या आहेत. दुसरीकडे चांदीच्या किमतीत २६० रुपयांची किरकोळ वाढ नोंदवली गेली. गेल्या आठवड्यात चंदेरी धातूचा एक किलोचा भाव २ लाख ४५ हजार रुपयांवर गेला होता. दोन्ही धातूंमध्ये घसरण झाल्याने सामान्य खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे ताजे दर (१ सप्टेंबर २०२६)
| शहर | २४ कॅरेट सोनं | २२ कॅरेट सोनं |
| दिल्ली | १,५३,७१० | १,४०,९०१ |
| मुंबई | १,५३,९७० | १,४१,१३९ |
| बंगळुरू | १,५४,०९० | १,४१,२४९ |
| कोलकाता | १,५४,६६० | १,४०,९५६ |
| हैदराबाद | १,५४,२२० | १,४१,३६८ |
वायदा बाजारात (MCX) सोन्याची घसरण
आज १ सप्टेंबर रोजी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव ३१० रुपयांनी घसरून १,५४,१५० रुपये प्रति १० ग्राम वर व्यवहार करत होता. तर दुसरीकडे, कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचा दर थोड्या वाढीसह २,३४,०५९ रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचला.
काय आहे पंतप्रधान मोदींचे आवाहन?
भारतात सण-उत्सव आणि लग्नसराईच्या काळात सोने खरेदीची मोठी परंपरा आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केले आहे की, खूप महत्त्वाची गरज असेल तरच सोने खरेदी करावे. यापूर्वी १० मे रोजी देखील पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आणि परकीय चलन वाचवण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.
बाजारात घसरण का?
- बाजार विश्लेषकांच्या मते, फेड चेअर केविन वॉर्श यांचे कठोर वक्तव्य आणि अमेरिकन मध्यवर्ती बँकेचे व्याजदराबाबतचे कडक धोरण सोन्याच्या घसरणीला कारणीभूत ठरत आहे.
- हॉर्मुझच्या सागरी मार्गातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. यामुळे जागतिक महागाई वाढण्याची भीती आहे.
