Gold Rate Prediction 2026-2028: पुढील दोन वर्षांत सोन्याचे भाव नवीन उच्चांकी पातळी गाठू शकतात. यामागे मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची वाढलेली खरेदी हे कारण आहे, तर दुसरीकडे गुंतवणूकदार भू-राजकीय तणाव, वाढते सरकारी कर्ज आणि आर्थिक अनिश्चिततेपासून सुरक्षित राहण्यासाठी सोन्याकडे वळत आहेत. याबाबत फायनान्शिअल टाइम्सचने वृत्त दिले आहे.

वृत्तात नमूद केल्याप्रमाणे, फंड व्यवस्थापकांना मध्यम ते दीर्घ कालावधीत सोन्याचे भाव वाढण्याची अपेक्षा आहे. सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याची मागणी, सरकारी वित्तस्थितीबद्दलची चिंता आणि चलनाची स्थिरता यांसारख्या घटकांमुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळत आहे. याव्यतिरिक्त, मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोन्याची खरेदी ही या मौल्यवान धातूच्या भविष्यातील वाटचालीसाठी एक महत्त्वाचा घटक ठरली आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालातील तात्पुरत्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात मध्यवर्ती बँकांनी सुमारे ६३ टन सोन्याची खरेदी केली. नोव्हेंबर २०२४ नंतरची ही एका महिन्यातील सर्वाधिक खरेदी ठरली आहे. ही आकडेवारी मध्यवर्ती बँका आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संकलित करण्यात आली आहे.

जानेवारी महिन्यात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे, सोन्याचा भाव प्रति औंस ५,५०० डॉलर्सच्या वर गेला होता. मात्र त्यानंतर किमती पुन्हा खाली आल्या. असे असले तरी, सोन्याचे भाव ऐतिहासिकदृष्ट्या उच्च पातळीवर कायम आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला झालेली मोठी विक्री पाहता, आता सोने आणि चांदीच्या किमती काही प्रमाणात सावरताना दिसत आहेत. शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी, कॉमेक्सवर सोन्याचे वायदे भाव ०.१८ टक्क्यांच्या वाढीसह प्रति औंस ४,१७७.५० डॉलर्सवर होते, तर चांदीचे वायदे भाव ०.४८ टक्क्यांच्या वाढीसह प्रति औंस ५७.४३ डॉलर्सवर पोहोचले होते.

मात्र, देशांतर्गत बाजारात सोने-चांदीच्या किमतींवर दबाव कायम आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, गुरुवारी नवी दिल्लीत सोन्याच्या किमती ९०० रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम १.४९ लाख रुपयांवर आल्या आहेत. सलग चौथ्या सत्रात सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली. चांदीच्या किमतीत ६,००० रुपयांची घसरण होऊन ती प्रति किलो २.१५ लाख रुपयांवर आली आहे.

डॉलरवरील विश्वास कमी

एऑन इन्हेस्टमेंट्सचे अधिकारी पॉल कार्न यांनीही अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की, पुढील दोन वर्षांत सोन्याचे भाव नवीन उच्चांकी पातळी गाठू शकतात. त्यांनी असे म्हटले की, अमेरिकन डॉलरवरील विश्वास कमी होत चालल्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळू शकतात.