Gold Rate Today analysis shows Trump Iran Deal impact on MCX gold prices: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या काही वक्तव्यामुळे शेअर बाजारासह सोने आणि चांदीच्या भावांत चढ-उतार झाल्याचे आपल्याला अनेकदा पाहायला मिळाले आहे. आता त्यांनी इराणबरोबरच्या संभांव्य शांतता करारावर वक्तव्य केल्याने सोन्याचे भाव सात आठवड्याच्या उच्चांकावर पोहचले आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर आज १,४९,०२९ वर उघडला आणि व्यवहार सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच त्याने प्रति १० ग्रॅम १,४९,२५० चा उच्चांक गाठला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोन्याच्या दराने सात आठवड्यांतील उच्चांक गाठत ४,३६३.६० डॉलर प्रति औंस ही पातळी गाठली आहे. पण, उच्च पातळीवर नफा वसुली झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव घसरून ४,३२० डॉलर प्रति औंस झाले, तर मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर १,४९,००० रुपयांच्या वर कायम राहिला.
बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिका-इराणमधील तणाव निवळत असल्याने आणि ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ पुन्हा खुला होण्याच्या आशेमुळे कच्च्या तेलाच्या किमती आणि नजीकच्या काळात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याबाबतची चर्चा यांवर नियंत्रण येण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून अमेरिकेच्या सरकारी रोख्यांवरील परताव्यावर दबाव निर्माण झाला असून, गुंतवणूकदार त्यांचे पैसे अमेरिकन रोख्यांमधून काढून सोने आणि इतर सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वळवत आहेत.
आज सोन्याचा भाव का वाढत आहे?
आज सोन्याचे दर वाढण्यामागील कारणांवर बोलताना, एनरिच मनीचे सीईओ पोनमुडी आर म्हणाले, “भू-राजकीय वातावरणात सुधारणा होऊनही, ट्रेझरी यील्ड्समधील नरमाई, डॉलरचे कमजोरी आणि आक्रमक चलनविषयक कठोर धोरणांच्या कमी झालेल्या अपेक्षांमुळे सोन्याच्या दरात आज वाढ कायम राहिली. यातून हे सूचित होते की, गुंतवणूकदार मध्य-पूर्व करारावर आणि अमेरिकेच्या व्याजदरांच्या दृष्टिकोनावर अधिक स्पष्टतेची वाट पाहत असताना काही प्रमाणात बचावात्मक गुंतवणूक कायम ठेवत आहेत.”
सेबी नोंदणीकृत बाजार तज्ज्ञ, अनुज गुप्ता म्हणाले, “कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असल्यामुळे अमेरिकेच्या सरकार रोख्यांच्या परताव्यावर आणि डॉलरवर दबाव येत आहे, कारण कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत राहिल्यास महागाई नियंत्रणात राहण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीत अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरवाढ होण्याची शक्यता कमी आहे.”
