Gold Silver ETF crash market loss : भारतीय गुंतवणूकदारांना आज (सोमवार २८ सप्टेंबर) एकामागून एक धक्के बसत आहे. सकाळी शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण झाल्याने ६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. हा धक्का सहन करत असतानाच आता सोन्या आणि चांदीचे ईटीएफही कोसळले आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिजर्व्हकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमतींमुळे ही घसरण झाली. महागाईच्या वाढत्या चिंतेमुळे जगभरात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पिवळ्या धातूवर विक्रीचा जबरदस्त दबाव आला.

चांदीच्या ईटीएफला सर्वाधिक फटका

  • या घसरणीचा सर्वाधिक फटका चांदीच्या ईटीएफला बसला आहे. त्यात ३.६ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे, तर सोन्याचे ईटीएफ २ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. यामध्ये एसबीआय सिल्व्हर ईटीएफ सर्वाधिक ३.५९ टक्के घसरून २१६.२३ रुपयांवर आला. निप्पॉन इंडिया सिल्व्हर ईटीएफ ३.५७ टक्के घसरणीसह २१०.९९ रुपयांवर बंद झाला, तर टाटा व आयसीआयसीआय प्रुडेन्शियल सिल्व्हर ईटीएफ अनुक्रमे ३.५१ टक्के आणि ३.४४ टक्के घसरले आहेत.
  • दुसरीकडे सोन्याच्या ईटीएफमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल गोल्ड ईटीएफ २.६४ टक्के घसरून १२५.६३ रुपयांवर, तर एसबीआय गोल्ड ईटीएफ २.५५ टक्के घसरून १२५.१६ रुपयांवर बंद झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात काय स्थिती आहे?

आंतरराष्ट्रीय बुलियन बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी पडझड झाली आहे. स्पॉट गोल्ड २.१ टक्क्यांनी घसरून ४,१९८.१० डॉलर प्रति औंसवर आले. सप्टेंबर महिन्यानंतरची ही सर्वोच्च एका दिवसाची घसरण ठरली आहे, तर स्पॉट सिल्व्हर ३.४ टक्क्यांच्या घसरणीसह ६२.०८ डॉलर प्रति औंसवर पोहोचले. देशांतर्गत कमोडिटी बाजारात सप्टेंबर २०२६ ची चांदी वायदा ६,६६१ रुपयांनी कोसळून २,२८,०३५ रुपये प्रति किलोवर आली, तर ऑक्टोबर २०२६ चे सोने वायदा ३,२१४ रुपयांनी घसरून १,४७,६६७ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले.

भाव घसरण्यामागची मुख्य कारणे कोणती?

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा संघर्ष संपवण्याचा आणि होर्मुझचा सागली मार्ग खुला करण्याचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. ब्रेंट क्रूड ३.२९ टक्क्यांनी उसळून १०७.७५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे.
  • महागाई वाढल्यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक आगामी काळात व्याजदर आणखी वाढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ट्रेडरच्या मते, ऑक्टोबरमध्ये व्याजदर वाढण्याची ६८ टक्के शक्यता वर्तवली जात आहे.
  • व्याजदर वाढल्यामुळे सोन्या-चांदीसारख्या निश्चित उत्पन्न नसलेल्या गुंतवणुकीपेक्षा ब्राँड अधिक आकर्षक वाटतात. ज्यामुळे गुंतवणूकदार पैशांची इतरत्र गुंतवणूक करतात.