लंडन : या आठवड्यात विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर शुक्रवारी सोने, चांदी आणि तांब्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली. अमेरिकेत व्याजदरांमध्ये कपात होण्याच्या अपेक्षा मावळू लागल्या असून डॉलर स्थिर झाल्याने अस्वस्थ गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्यावर भर दिला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नर केविन वॉर्श यांची अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले. या नियुक्तीच्या अपेक्षेने डॉलर निर्देशांक मजबूत झाला. केविन वॉर्श हे समतोल विचारांचे आहेत. त्यामुळे ते व्याज दरकपातीसाठी दबाव आणणार नाहीत, असे पॅनम्युअर लिबेरमचे विश्लेषक टॉम प्राइस म्हणाले. भांडवलाचे संरक्षण व्हावे म्हणून सर्वसाधारण गुंतवणूकदार नफा वसूल करत आहेत.

जानेवारीत आतापर्यंत सोने १७ टक्के आणि चांदी ३९ टक्क्यांनी वाढल्यानंतर महिन्याच्या शेवटच्या व्यवहार सत्रात नफा-वसुली झाली. मागील काही दिवस कमी तरलतेचे व्यवहार होते आणि ‘संधी हुकण्याच्या भीती’मुळे या हालचाली झाल्या. अलीकडील उसळीचे स्वरूप अस्थिर होते, असे सॅक्सो बँकेचे वस्तू बाजार धोरण प्रमुख ओले हॅन्सन यांनी सांगितले.  गुरुवारी सोने आणि चांदीने अनुक्रमे औंसमागे ५,५९४.८० आणि १२१.६० डॉलरचे विक्रमी उच्चांक गाठले होते.

’जळगावच्या बाजारपेठेत सातत्याने दरवाढ होत असलेली चांदी शुक्रवारी ५६ हजारांनी घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. सोन्याच्या दरातही १० हजार रुपयांपेक्षा अधिक घट नोंदवली गेली.

’गुरुवारी एका दिवसात २० हजार ६०० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो ४ लाख ६ हजार ८५० रुपयांपर्यंत पोहचले होते.

’शुक्रवारी चांदीत ५६ हजार ६५० रुपयांची घट झाली. त्यामुळे दर जीएसटीसह प्रति किलो ३ लाख ५० हजार २०० रुपयांपर्यंत घसरले. ’सोन्याच्या दरात शुक्रवारी १० हजार ८१५ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख ७२ हजार ०१० रुपयांपर्यंत घसरले.