Gold Silver Price Crash : गेल्या काही दिवसांच्या मोठ्या तेजीनंतर आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. एमसीएक्स (MCX) वर एप्रिल एक्सपायरी असलेले गोल्ड फ्युचर्स जवळपास ५ टक्क्यांनी घसरून प्रति १० ग्रॅम १७५१०० वर आले आहेत. विशेष म्हणजे अवघ्या एका दिवसापूर्वी सोन्याच्या किमतीने १९३०९६ रूपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता.

इतकेच नाही तर फेब्रुवारी आणि जून एक्सपायरी असलेल्या कॉन्ट्रॅक्ट्समध्येही सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे ६ टक्क्यांची घसरण झाली आहे. सिल्व्हर फ्यूचर्स बद्दल बोलायचे झाले तर, मार्च एक्सपायरी असलेल्या सिल्व्हर फ्यूचर्सचे दर प्रति किलो सुमारे ६ टक्क्यांनी कोसळून ३७५९०० रुपयांवर आले आहेत. मे आणि जुलै एक्सपायरीच्या फ्युचर्समध्येही ६ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. याचा ताण गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफवर देखील पाहायला मिळाला.

सोन्या-चांदीच्या ईटीएफमध्ये मोठी पडझड

एका वर्षात १०४ टक्के रिटर्न देणारा निप्पन इंडिया ईटीएफ जवळपास १० टक्के कोसळून १३२ रुपयांवर आला. तर आयसीआयसीआय प्रूडेंशियल गोल्ड ईटीएफ जवळपास १० टक्के तर एक्सिस गोल्ड ईटीएफ जवळपास ९ टक्के खाली घसरला. यूटीआय गोल्ड ईटीएफ, एडलवाइज गोल्ड ईटीएफ, एचडीएफसी गोल्ड ईटीएफ, क्वांटम गोल्ड ईटीएफ, डीएसपी गोल्ड ईटीएफसह अनेकांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.

चांदीच्या ईटीएफबद्दल बोलायचे झाल्यास मिरे अॅसेट सिल्व्हर ईटीएफ जवळपास १३ टक्के कोसळला. तर मोतीलाल ओसवाल सिल्व्हर ईटीएऱ जवळपास १२.५ टक्के कोसळून प्रति यूनिट ३३०.०१ रुपयांवर आला. एचडीएफसी सिल्व्हर ईटीएफ आणि निप्पॉन इंडिया सिल्व्हर ईटीएऱमध्ये देखील १४ टक्क्यांहून अधिकची घसरण झाली. आदित्य बिर्ला सन लाइफ सिल्व्हर ईटीएफ, ग्रो सिल्व्हर ईटीएफ, आयसीआयसीआय प्रूडेंशियल सिल्व्हर ईटीएफ, अॅक्सिस सिल्व्हर ईटीएफ, यूटीआय सिल्व्हर ईटीएफ, टाटा सिल्व्हर ईटीएफ आणि कोटक सिल्व्हर ईटीएफ यांच्यावर देखील तीव्र तणावाखाली राहिले.

सोन्या-चांदीची किंमत का घसरली? नेमकं कारण काय?

अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे पुढचे चेअरमन हे अधिक कठोर असू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात असल्याने जगभरात सोन्या-चांदीच्या किंमती कोसळत आहेत. शुक्रवारी स्पॉट गोल्डमध्ये ५ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. विशेष म्हणजे एक दिवस आधीच हे ५५९४.८२ अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी उंचीवर पोहचले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज (शुक्रवारी) फेडरल रिझर्व्हच्या नवीन अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे. सध्याचे प्रमुख जेरोम पॉवेल यांचा कार्यकाळ मे महिन्यात संपला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसारसार, केसीएमचे चीफ ट्रेड अॅनालिस्टटिम वॉटरर यांचे म्हणने आहे की, कठोर फेडरल रिझर्व्ह अध्यक्षांच्या नियुक्तीची शक्यता, डॉलर मजबूत होणे आणि सोन्याची ओव्हरबॉट स्थिती हे सर्व घटक मिळून यावर दबाव तयार झाला आणि सोने-चांदीच्या किमती कोसळल्या स्टोनएक्सचे वरिष्ठ अॅनालिस्ट मॅट सिम्पसन यांच्या मते केविन वॉर्श यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, त्यांच्या संभाव्य नियुक्तीच्या वृत्ताने सोन्यावर दबाव निर्माण झाला आहे.