Gold Silver Price Rise : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत सुरू असलेल्या घसरणीला अखेर ब्रेक लागला. यावर्षीच्या सुरुवातीला सोन्याने १ लाख ८० हजार रुपयांच्या उच्चांकाला स्पर्श केला होता, तर चांदीनेही ४ लाख प्रतिकिलो भाव नोंदवला होता. मात्र, यात मोठी घसरण होऊन सोने विक्रमी पातळीवरून तब्बल ४२ टटक्के, तर चांदीमध्येही ५५ टक्क्यांची मोठी घसरण झाली होती. मात्र, धनतेरस आणि दिवाळी यांसारख्या प्रमुख सणांच्या पूर्वसंध्येला सोन्या-चांदीच्या भावात सुधारणा पाहायला मिळत आहे. यामुळे सराफ बाजारात आणि ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

भारतीय सराफा बाजारात काय स्थिती?

इंडियन बुलियन वेबसाईटनुसार, आज १० ग्रॅम शुद्ध २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ४८० रुपयांची वाढ झाल्याने भाव १ लाख ३९ हजार ३३० रुपयांवर पोहचला आहे. दुसरीकडे चांदीची किंमत प्रतिकिलो २९३० रुपयांनी वधारला आहे. मौल्यवान धातूंच्या किमतीत तेजी असली तरी गेल्या काही दिवसातील हा सर्वात कमी दर आहे.

मल्टिडोडिटी एक्सचेंजवर भाव वधारले

मल्टिडोडिटी एक्सचेंजवर सोमवारी १ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ४९५ रुपयांची वाढ झाली. यामुळे एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव १.३९ लाख रुपये प्रति १० ग्रॅमच्या जवळ पोहोचला आहे. आज बाजाराची सुरुवातच या उच्च पातळीवर झाली. सोन्यासोबतच चांदीच्या वायदा किंमतीतही मोठी उसळी दिसून आली असून, एमसीएक्सवर चांदी ३,३८६ रुपयांनी उसळून १,८२,४५५ रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचली आहे.

जागतिक बाजारातही तेजीचे संकेत

फक्त देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदीच्या किंमतीत तेजी दिसत आहे. जागतिक बाजारात सोन्याचा हाजिर भाव ०.७ टक्क्यांनी वाढून ३,९००.९० डॉलर प्रति औंस झाला. मागील सत्रात हा भाव एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेला होता. डिसेंबर डिलिव्हरीसाठी अमेरिकन सोन्याचा वायदा भाव ०.३ टक्के वाढीसह ३,९०९.७० डॉलर प्रति औंसवर बंद झाला. चांदीचा हाजिर भाव १.८ टक्के उसळून ४९.९७ डॉलर प्रति औंस झाला. प्लॅटिनमचा भाव ०.१% वाढीसह १,४३२.६३ डॉलर, तर पॅलेडियम ९७६.३१ डॉलरवर स्थिर राहिला.

किंमतीत अचानक तेजी येण्याचे कारण काय?

बाजार विश्लेषकांच्या मते, कच्च्या तेलाच्या किंमतीत ३ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, ज्याचा थेट फायदा सोन्या-चांदीच्या बाजाराला मिळत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सध्या तरी व्याजदरात वाढ केलेली नाही. त्यामुळे सोन्यावरील दबाव कमी झाला आहे. दुसरीकडे सणासुदीच्या काळातील वाढलेली मागणी आणि अमेरिकन डॉलर तसेच कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली घट यामुळे बुलियन मार्केटला हा अल्पकालीन आधार मिळाला आहे.

सोने-चांदी घसरणार?

तज्ज्ञांच्या मते, ही तेजी तात्कालिक असून, आगामी काळात सोन्या-चांदीच्या किंमतींवर पुन्हा दबाव कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.