Gold Silver Price Surge US Election Impact : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीच्या निकालाचे परिणाम जगभरातील बाजारांवर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून घसरत असलेल्या सोने आणि चांदीच्या किमतीने आज (५ नोव्हेंबर २०२६) मोठी भरारी घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव तब्बल २०,००० रुपये प्रति १० ग्रॅमने वाढला आहे. जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या किंमतीने अचानक उसळी घेतली आहे. भारतीय सराफा बाजारातही सोने-चांदी वधारले आहेत. दिवाळीच्या तोंडावर दर पुन्हा वाढल्याने खरेदीदारांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर काय?
बुलियन वेबसाईटनुसार, २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमतीत १८२० रुपयांची वाढ झाल्यानंतर १० ग्रॅमचा दर १ लाख ४५ हजार ५९० रुपये झाला आहे. दुसरीकडे चांदीच्या किंमतीत प्रतिकिलो १३५० रुपयांची वाढ झाल्याने भाव १ लाख ८९ हजार ५६० रुपयांवर गेला आहे. गेल्या २ दिवसांत मौल्यवान धातूंच्या किमतीमधील ही मोठी वाढ आहे. यापूर्वी १ तोळ्याचा सोन्याचा भाव १ लाख ३८ हजार इतका खाली आला होता, तर चांदी १ लाख ७८ हजार रुपये प्रतिकिलो इतका खाली आला होता.
सोन्या-चांदीच्या तेजीमागची ५ महत्त्वाची कारणे
१. अमेरिकेतील निवडणुकांनंतर डॉलर कमजोर
जागतिक स्तरावर सोन्याचा बहुतांश व्यापार डॉलरमध्ये होत असल्याने या चलनाचा थेट परिणाम किमतींवर होतो. जेव्हा डॉलर कमजोर पडतो, तेव्हा इतर चलनांमध्ये सोने खरेदी करणे स्वस्त होते, ज्यामुळे मागणी वाढते. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट्सच्या विजयामुळे डॉलर आणि सरकारी कर्ज रोख्यांमध्ये नरमी आली आहे. परिणामी सोन्याला मोठा फायदा मिळत आहे.
२. इराणसोबतचा वाद निवळण्याची शक्यता
अमेरिकेच्या दोन्ही सभागृहात डेमोक्रेटिक पक्षाला बहुमत मिळाल्याने इराणसोबतचा संघर्ष निवळण्याचे संकेत मिळत आहे. अमेरिका आता लष्करी कारवाईऐवजी चर्चेचा मार्ग निवडू शकते, अशी चर्चा बाजारात सुरू आहे. भू-राजकीय तणाव कमी झाल्याने महागाईची चिंता काहीशी कमी झाली आहे, ज्याचा थेट फायदा सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीला मिळाला.
३. कच्च्या तेलाचे भाव कोसळले
अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्याच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाचे दर दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. तेल स्वस्त झाल्यामुळे महागाईचा भार कमी होण्यास मदत होते. महागाईचा अंदाज घटल्यास मध्यवर्ती बँकांवर व्याजदर उच्च पातळीवर ठेवण्याचा दबाव कमी होतो. यामुळे गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळत आहेत.
४. अमेरिकन बॉन्ड यील्डमध्ये नरमी
अमेरिकेची १० वर्षांची सरकारी बॉन्ड यील्ड निवडणुकीनंतर ६ बेसिस पॉईंटने घसरून ४.८९ टक्क्यांवर आली. बॉन्ड यील्ड म्हणजे सरकारी रोख्यांवर मिळणारा परतावा. जेव्हा यील्ड जास्त असते, तेव्हा गुंतवणूकदार सोन्यापेक्षा कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. पण, निवडणुकीनंतर सरकारचा खर्च आणि कर्ज घेण्याच्या क्षमतेवर अंकुश लागण्याची शक्यता आहे. यामुळे बॉन्ड यील्डवरील दबाव कमी झाला असून सोन्यात तेजी आली.
५. डॉलर एका महत्त्वाच्या पातळीवर स्थिर
गेल्या काही महिन्यांत डॉलर इंडेक्स ९५.५५ वरून १०२.९४ पर्यंत पोहोचला होता, ज्यामुळे सोन्यात मोठी घसरण झाली. आता डॉलरची ही तेजी १०० ते १०३ च्या दरम्यान थांबलेली दिसत आहे. तांत्रिक पातळीवर डॉलर एका ठराविक मर्यादेत अडकल्यामुळे सोन्याला आधार मिळत आहे.
