Gold Silver Price Today : भारतीय सराफा बाजारात सलग ३ दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत आज वाढ पाहायला मिळाली. मात्र, चांदीच्या किमतीत अद्याप घसरण थांबलेली नाही. मागील महिन्याभरात पांढऱ्या धातूच्या किमतीत सुमारे ६ टक्के घसरण नोंदवली गेली. दुसरीकडे सोने आठवडाभरात २.६२ टक्के घसरलं असले तरी महिन्यात मौल्यवान धातूच्या किमतीत १.३६ टक्के इतकी वाढ झाली आहे. असे असले तरी दोन्ही धातू त्यांच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा खूपच स्वस्त मिळत आहेत.
सोने-चांदीचे आजचे भाव काय?
इंडियन बुलियन वेबसाईटनुसार, आज मंगळवार, ९ जून २०२६ रोजी सोन्याची किंमत २३० रुपयांची किरकोळ वाढ झाली. आता २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर १,५५,२३० रुपये इतका झाला आहे. सर्वकालीन उच्चांक १,८०,००० रुपयांपेक्षा सोने अजूनही सुमारे २४,७२० रुपये स्वस्त मिळत आहे. चांदीच्या किमतीत आज ६९० रुपयांची घसरण झाली. सध्या प्रति किलो चांदीचा दर २४६,७४० रुपये झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीत सतत घसरण पाहायला मिळत आहे. २९ जानेवारी २०२६ मध्ये चांदीने ४,००,७८० रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. म्हणजे उच्चांकापेक्षा चांदी १,५४,०४० रुपये स्वस्त मिळत आहे.
१८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी!
१८ कॅरेट सोने हे ७५ टक्के शुद्ध सोन्याचे असते. उर्वरित २५ टक्के भागात तांबे, चांदी आणि जस्त यांसारखे धातू मिसळले जातात. हे धातू सोन्याला अधिक मजबूत बनवतात, ज्यामुळे दागिने टिकाऊ होतात. २४ कॅरेट सोने, जे १०० टक्के शुद्ध असते, ते खूप मऊ असते. त्यामुळे त्यापासून दागिने बनवणे कठीण जाते, कारण ते सहज तुटू किंवा वाकू शकते. म्हणूनच २४ कॅरेट सोने जास्त करून नाणी किंवा बिस्किटे यांसारख्या गुंतवणुकीसाठी वापरले जाते. पण, १८ कॅरेट सोने दागिन्यांसाठी योग्य आहे, कारण ते मजबूत आणि वाजवी दोन्ही आहे. हे धातू मिसळल्यामुळे सोन्याचा रंग आणि पोतही बदलतो. उदाहरणार्थ, तांबे मिसळल्याने सोन्यामध्ये लालसर चमक येते, ज्याला रोज गोल्ड म्हणतात. चांदी मिसळल्याने हलका रंग आणि अधिक चमक मिळते. अशा प्रकारे, १८ कॅरेट सोन्यापासून वेगवेगळ्या रंगांचे दागिने तयार करता येतात.
मौल्यवान धातू का कोसळतायेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० मे २०२६ रोजी हैदराबाद येथून देशवासियांना परकीय चलन वाचवण्यासाठी महत्त्वाचे आवाहन केलं होतं. यामध्ये पुढील वर्षभर सोने खरेदी थांबण्यास सांगितले होते. दुसरीकडे सोने-चांदीवरील आयात शुल्कात थेट दुप्पट वाढ करत १५ टक्के इतके केले. परिणामी सोन्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दागिन्यांच्या खरेदी ७० टक्केपर्यंत घट झाल्याचे सराफा बाजाराचे म्हणणे आहे. दुसरीकडे औद्यागिक मागणीतील अनिश्चिततेमुळे चांदीच्या किमतीही कोसळत आहेत.
