Gold Silver Rate Marathi Today : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा तात्पुरता शांतता करार ‘संपल्याचे’ जाहीर केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारासह देशांतर्गत सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर कमालीचे कोसळले आहेत. बुधवारी सोन्याचे दर १ टक्क्यांहून अधिक घसरले असून, स्थानिक बाजारात आज सोन्याच्या किमतीत २५० रुपयांची, तर चांदीमध्ये ६१० रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.

बाजारपेठेतील आजचे ताजे दर

आज (९ जुलै २०२६) प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत १,४३,९०० रुपये झाली आहे. तर प्रति किलो चांदीचा भाव आता २,२२,७१० रुपयांवर आला आहे. आज मौल्यवान धातूंमध्ये किरकोळ घसरण दिसत असली तरी आठवड्याचा विचार केला तर सोने २२६० रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदी १०,६३० रुपयांनी कोसळली आहे.

एका महिन्यात ग्राहकांना मोठा दिलासा: सोने-चांदी प्रचंड स्वस्त!

गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंमध्ये सुरू असलेली ही घसरण गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी मोठी संधी मानली जात आहे. महिन्यात सोन्याची किंमत ८,७०० रुपयांनी घसरली आहे, तर चांदी तब्बल १६,३०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. यामुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ट्रम्प यांच्या एका घोषणेमुळे बाजारात भूकंप का झाला?

सोन्या-चांदीच्या किमतीत झालेल्या या ताज्या घसरणीमागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक वक्तव्य कारणीभूत ठरले आहे. ट्रम्प यांनी इराणसोबतचा तात्पुरता शांतता करार आता संपुष्टात आल्याचे जाहीर केले. या घोषणेमुळे जागतिक राजकीय पटलावर पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण झाली आहे. या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव झपाट्याने वधारले आहेत.

गुंतवणूकदार सोनं का विकतायेत?

तेलाचे भाव वाढल्यामुळे जागतिक स्तरावर महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, अमेरिकेची मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’ महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आगामी काळात व्याजदरात वाढ करू शकते, या भीतीने गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. व्याजदर वाढणार असल्याने सोन्यावरील पकड सैल झाली असून ते १ टक्क्यापेक्षा जास्त घसरले.

आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा भू-राजकीय तणाव वाढतो आणि महागाईमुळे अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा डॉलर मजबूत होतो आणि सोन्याच्या किमतीवर दबाव येतो.