Gold Silver Price 1 June 2026 : सध्या सर्वसामान्यांची इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे. कारण, चहूबाजूंनी सुरू असलेल्या महागाईच्या झळ्यांनी मध्यमवर्ग होरपळून निघत आहे. इंधन दरवाढीनंतर आजपासून (१ जून २०२६) व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, यात भरीस भर म्हणून आता सोन्याच्या किमतीतही मोठा भडका उडाला आहे. बुलियन वेबसाईटनुसार, भारतीय सराफा बाजारात आज सोन्याचा भाव तब्बल ३००० रुपयांनी वधारला आहे. दुसरीकडे चांदीत काहीशी नरमाई पाहायला मिळाली.

भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीची स्थिती काय?

आज, सोमवार १ जून रोजी सोन्याच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी उसळी नोंदवण्यात आली. आज एकाच दिवसात सोन्याच्या किमतीत तब्बल २९५० रुपयांची वाढ झाली आहे. आठवड्याचा विचार केला तर १० ग्रॅम सोन्याची किमत अजूनही थोडी स्वस्त आहे. तर महिन्याचा विचार करता सोन्याच्या किमतीत ५ टक्के इतकी वाढ झाली आहे. दुसरीकडे, औद्योगिक क्षेत्रातून मागणीची अनिश्चितता वाढल्याने चांदीत सतत घसरण होत चालली आहे. १ जून रोजी चांदी ४८० रुपयांनी कोसळली. तर आठवड्यात चांदीत सुमारे ४ टक्केंनी स्वस्त झाली आहे.

कॉमोडिटी बाजारात उलट स्थिती

जागतिक बाजारातील वाढत्या अनिश्चिततेमुळे आज, १ जून २०२६ रोजी कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे तीन टक्क्यांची मोठी उसळी नोंदवली गेली आहे. पश्चिम आशियातील राजकीय तणावाचा थेट परिणाम कमोडिटी बाजारावर झाला असून, जागतिक आणि देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींवर दबावाचे चित्र पाहायला मिळत आहे. सोने प्रति १० ग्रॅम १,५९,८७६ रुपये या पातळीवर आले. (गेल्या आठवड्यात शुक्रवारी बाजार १,५६,६०० रुपयांवर बंद झाला होता). तर चांदी प्रति किलोग्राम २,६६,९२९ रुपये या दरावर ओपन झाली. (शुक्रवारी चांदीचा बंद भाव २,६८,५०० रुपये होता).

सोने-चांदीच्या किमतीत अस्थिरता का?

जेव्हा भू राजकीय तणाव वाढतो, तेव्हा कच्चे तेल आणि डॉलर इंडेक्स मजबूत होतात. अशा स्थितीत सोन्याला ‘सुरक्षित गुंतवणूक’ मानले जात असले, तरी डॉलर इंडेक्स खूप मजबूत झाल्यास तात्पुरत्या स्वरूपात सोन्यावर दबाव येतो, जो आज कॉमेक्स बाजारात ३६.५० डॉलर्सच्या घसरणीच्या रूपाने दिसत आहे. मात्र, देशांतर्गत बाजारात रुपयाच्या कमजोरीमुळे आणि स्थानिक मागणीमुळे एमसीएक्सवर सोन्याचा भाव अजूनही १.५९ लाखांच्या वर टिकून आहे. जोपर्यंत मिडिल ईस्ट संकट निवळत नाही, तोपर्यंत कमोडिटी बाजारातील ही अस्थिरता अशीच सुरू राहील.