Gold Silver Price Today : जागतिक पातळीवरील भू राजकीय घडामोडींचा थेट परिणाम आज सराफा बाजारावर पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने डॉलर कमकुवत झाला आहे. परिणामी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा मौल्यवान धातूंकडे वळवला. आज गुरुवार, ४ जून २०२६ रोजी सकाळच्या सत्रात सराफा बाजारात सोने आणि चांदीने नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या वर्षभरात सोन्याची किंमत तब्बल ६१ टक्के वाढली असून चांदीने तर १६० टक्क्यांपर्यंत बंपर परतावा दिला आहे.
सोने-चांदीच्या किमतीत पुन्हा तेजी
भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीच्या किमतीने पुन्हा उभारी घेतली आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत थेट १,५९,४६० रुपये (प्रति १० ग्रॅम) झाली असून, यामध्ये तब्बल ९०० रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या महिन्याभरात सोन्याची किंमत जवळपास ८ हजार रुपयांनी वधावरी आहे. दुसरीकडे घसरणाऱ्या चादीला ब्रेक लागला असून आज चांदीच्या किमतीत ९९० रुपयांची वाढ झाली. महिन्याचा विचार केला तर चांदीच्या दराने तब्बल १९ हजारांची झेप घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचा भडका
गुरुवारी सकाळी ८.३० वाजता आंतरराष्ट्रीय कॉमेक्स बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ०.७३% च्या तेजीसह ४,४९९.४० डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. तर चांदीच्या भावातही ०.०९% ची वाढ झाली असून, ती ७३.७६० डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. पश्चिम आशियातील तणाव निवळण्याच्या आशेमुळे आज सकाळपासून कच्च्या तेलाच्या किमतीत १.३०% ची मोठी घसरण झाली आहे.
भारतीय वायदा बाजारात बंपर ओपनिंग
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सकाळी ९.०५ वाजता सोन्या-चांदीने जोरदार वाढीसह व्यवहार सुरू केला. आज सोन्याचा भाव १,५९,१३० रुपये या विक्रमी पातळीवर ओपन झाला. (३ जून रोजी तो १,५८,४४५ रुपयांवर क्लोज झाला होता.) तर चांदीचा भाव आज सकाळी २,६३,४३९ रुपये प्रति किलोग्रॅमवर ओपन झाला. (३ जून रोजी क्लोजिंग रेट २,६२,९०० रुपये होता.)
बाजारातील तेजीची कारणे काय?
इस्रायल आणि लेबनान या दोन्ही देशांमधील युद्ध थांबण्याच्या बातम्यांमुळे जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. दुसरीकडे इराणकडून मिळालेल्या संकेतानुसार अमेरिकेसोबतचा शांतता करार बारगळला आहे. मात्र, अमेरिकेच्या संसदेत चार रिपब्लिकन खासदारांनी इराण युद्ध संपवण्याच्या बाजूने मतदान केले आहे. तसेच, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला मोजतबा खामेनेई यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले आहेत.
