Gold Silver Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली असून दर आठवड्यात पहिल्यांदाच १ लाख ६० हजार रुपयांच्या खाली आले आहेत. आज (२७ ऑगस्ट २०२६) गुरुवारी सोन्याच्या किमतीत ७०० रुपयांची घसरण झाली असून चांदीचे दर स्थिर राहिले आहेत. दुसरीकडे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर गेल्या सत्रातील किंचित घसरणीनंतर मौल्यवान धातूंच्या बाजारात पुन्हा एकदा जोरदार तेजी परतली आहे.
आज सोन्या-चांदीचे दर काय आहेत?
बुलियन वेबसाईटनुसार, गेल्या महिन्याभरापासून तेजीत असलेले मौल्यवान धातूंच्या किमतींना आज ब्रेक लागला आहे. सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली. आज सोन्यात ७०० रुपयांची घसरण झाल्यानंतर १० ग्रॅम शुद्ध २४ कॅरेट धातूचा दर १ लाख ५८ हजार ७०० रुपये झाला आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात आज कोणताही बदल पाहायला मिळाला नाही.
प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे ताजे दर (२७ ऑगस्ट २०२६)
| शहर | २४ कॅरेट सोनं | २२ कॅरेट सोनं |
| दिल्ली | १,५८,११० | १,४४,४९३ |
| मुंबई | १,५८,३८० | १,४५,१८२ |
| बंगळुरू | १,५८,५०० | १,४५,२९२ |
| कोलकाता | १,५८,१७० | १,४४,९८९ |
| हैदराबाद | १,५८,६३० | १,४५,४११ |
शेअर बाजारात सोने-चांदी वधारले
आज, एमसीएक्सवर सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ६३७ रुपयांची वाढ होऊन तो १,६०,३०० रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे, चांदीमध्ये प्रति किलो १,६६८ रुपयांची मोठी वाढ नोंदवली गेली असून भाव २,४१,३०६ रुपये प्रति किलोग्रॅमवर जाऊन पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही हीच तेजी पाहायला मिळत असून सोन्याचा भाव ०.७१ टक्क्यांनी वाढून ४,६८६ डॉलर प्रति औंस, तर चांदी १.६७ टक्क्यांनी वधारून ६९ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.
चांदीचा तुफान परतावा
सोन्यापेक्षाही चांदीने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा दिला आहे. २०२३-२४ मध्ये सुमारे ७८,६०० रुपये प्रति किलो असणारी चांदी आज २४०,००० रुपयांचा टप्पा ओलांडून २,४१,३०६ रुपयांवर पोहोचली आहे. औद्योगिकीकरणातील वाढती मागणी आणि चलनातील बदलांमुळे ही तेजी दिसून येत आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला चांदीने ऐतिहासिक ४ लाख रुपये प्रतिकिलोच्या उच्चांकी भावाला स्पर्श केला होता. त्यानंतर चांदी मोठी घसरण होऊन भाव २ लाख ११ हजारांवर खाली आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा चंदेरी धातून जोर पकडला आहे.
भविष्यात सोने १५ लाखांवर जाणार?
- काही बाजार विश्लेषकांच्या मते, चालू वर्षात सोने ५,००० डॉलरचा टप्पा सहज पार करू शकते. मात्र, ‘इलेक्ट्रम’चे अध्यक्ष आणि अब्जाधीश थॉमस कपलान यांनी दिलेला अंदाज थक्क करणारा आहे. किटको न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, “दीर्घकालावधीत सोने ३०,०००, ४०,००० अगदी ५०,००० डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते.”
- (जर १ डॉलरचे मूल्य ९५ रुपये मानले, तर ५०,००० डॉलर प्रति औंस या दरानुसार भारतातील सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे १५ लाख रुपये होईल!)
दरातील या तेजीची मुख्य कारणे
- अमेरिकेत जुलै महिन्यातील वार्षिक महागाई दर अपेक्षांपेक्षा स्थिर राहिला आहे. सलग ६५ महिने हा दर अमेरिकन फेडच्या २ टक्के लक्ष्यापेक्षा वर राहिल्याने व्याजदरांबाबत अनिश्चितता वाढली आहे.
- होर्मुझच्या सागरी मार्गातील वाढत्या तणावामुळे आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे जगभरातील गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत.
- अमेरिकेचे सरकारी कर्ज ४० ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेले असून अर्थसंकल्पीय तूट वाढल्यामुळे डॉलर कमकुवत होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट फायदा सोन्याला मिळत आहे.
