Gold Silver Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोने आणि चांदीच्या दरांना अखेर ब्रेक लागला आहे. आज, ३१ ऑगस्ट रोजी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली. सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याची किंमत १८६० रुपयांनी घसरली, तर चांदी प्रतिकिलो १९५० रुपयांनी स्वस्त झाली आहे. आठवड्याभरात सोन्याचे दर ८५०० रुपयांनी कोसळले आहेत. तर चंदेरी धातूचे दरही ५००० रुपयांनी घसरले आहे. दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने सामान्य खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आज सोने-चांदीचे दर काय आहेत?
बुलियन वेबसाईटनुसार, २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम सोन्याच्या किमतीत १८६० रुपयांनी घसरल्याने भाव १ लाख ५४ हजार ९९० रुपयांवर आले आहेत. तर चांदी प्रतिकिरो १९५० रुपयांनी स्वस्त झाल्याने दर २ लाख ४० हजार २४० रुपये झाले आहे. गेल्या आठवड्यात दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी तेजी पाहायला मिळाली. यामुळे रक्षाबंधन सणाला अनेक बहीण-भावाचा हिरमोड पाहायला मिळाला. दुसरीकडे मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव १,८८७ रुपयांनी घसरून १,५४,३९४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे, तर चांदीच्या दरात ३,८५६ रुपयांची घसरण झाली असून ती २,३२,८४८ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
सोने-चांदी का घसरली?
- अमेरिकेतील बाँड यील्डमध्ये वाढ झाल्याने शुक्रवारी, (२८ ऑगस्ट) एकाच दिवसात सोन्याचे दर सुमारे ३.२ टक्क्यांनी घसरल्याने मौल्यवान धातूंच्या किमतींवरील दबाव वाढला.
- सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि उच्च बाँड यील्ड या दुहेरी संकटाचा सामना मौल्यवान धातूंना करावा लागत आहे.
- अमेरिकन ट्रेझरी बॉण्ड्सवर नियमित व्याज मिळते, तर सोन्या-चांदीतून असा कोणताही नियमित परतावा मिळत नाही. बाँड यील्ड वाढल्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित आणि जास्त परतावा देणाऱ्या सरकारी रोख्यांकडे आपला पैसा वळवत आहेत, ज्यामुळे सोन्या-चांदीवर विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे.
प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे ताजे दर (३१ ऑगस्ट २०२६)
| शहर | २४ कॅरेट सोनं | २२ कॅरेट सोनं |
| दिल्ली | १,५४,६०० | १,४१,७१७ |
| मुंबई | १,५४,८६० | १,४१,९५५ |
| बंगळुरू | १,५४,९९० | १,४०,०७४ |
| कोलकाता | १,५४,६६० | १,४१,७७२ |
| हैदराबाद | १,५५,११० | १,४२,१८४ |
भविष्यात सोने-चांदीच्या किमती किती वाढतील?
एनबीसीच्या वृत्तानुसार, मोनार्क पीएमएसच्या अंदाजानुसार २०२६ च्या अखेरीस सोन्याची किंमत प्रति औंस ३,४०० डॉलर ते ३,९०० डॉलर (३ लाख २४ हजार ३३३ रुपये) आणि चांदीची किंमत ४५ डॉलर ते ५५ डॉलरपर्यंत (४ हजार २९४ रुपये) असू शकते. जर यूएस फेडने सप्टेंबरमध्ये व्याजदर वाढवले, तर ही दरवाढ होण्याचा अंदाज आहे. याव्यतिरिक्त, कच्च्या तेलाच्या घसरणाऱ्या किमती आणि कमकुवत मागणीमुळे महागाई आणखी कमी होण्याची शक्यताही वर्तवली आहे.
