Gold Rate Today Price Drop : सोनं आणि चांदीच्या दरात आज, २ सप्टेंबर रोजी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर १११० रुपयांनी घसरला, तर चांदीच्या दरातही प्रतिकिलो १९६० रुपांची घट झालेली पाहायला मिळाली. तिकडे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे भाव तब्बल २,००० रुपयांनी घसरून १,४९,९०४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहेत. तर दुसरीकडे, चांदीचे दरही ३,५४९ रुपयांनी कोसळून २,२६,००० रुपये प्रति किलोग्रामवर व्यापार करत आहेत. या घसरणीमुळे सोन्याचे भाव गेल्या तीन आठवड्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत.

आजचे सोन्या-चांदीचे भाव काय?

बुलियन वेबसाईटनुसार, १० ग्रॅम शुद्ध सोन्याच्या किमतीत १११० रुपयांची घसरण झाल्यानंतर १ तोळ्याचा भाव १ लाख ५१ हजार ०५० रुपयांवर आला आहे. गेल्या आठवड्यात हेच दर १ लाख ६३ हजार रुपयांच्या जवळ पोहोचले होते. चांदीचे दर आज १९६० रुपयांनी घसरुन २ लाख ३२ हजार ८२० रुपयांवर आले आहे. गेल्या आठवड्यात चांदीचे दर २ लाख ४० हजार रुपयांवर पोहोचले होते.

प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे ताजे दर (२ सप्टेंबर २०२६)

शहर २४ कॅरेट सोनं२२ कॅरेट सोनं
दिल्ली १,५०,८२०१,३८,२५२
मुंबई १,५१,०८० १,३८,४९०
बंगळुरू१,५१,२००१,३८,६००
कोलकाता१,५०,८०१,३८,३०७
हैदराबाद १,५१,३२०१,३८,७१०

दर घसरण्याचे मुख्य कारण काय?

  • मध्य पूर्वतील संघर्ष तीव्र झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या जवळ पोहचली आहे. कच्च्या तेलाच्या किमती भडकल्याने महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे अमेरिकेत मध्यवर्ती बँकेकडून पुन्हा व्याजदर वाढवले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
  • आर्थिक संकटसमयी सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. मात्र, अमेरिकेच्या फेडने व्याजदर वाढवल्यास सोन्यातील गुंतवणूक घटते. कारण सोन्यावर कोणताही निश्चित व्याज परतावा मिळत नाही. याचाच थेट परिणाम आज सोन्या-चांदीच्या किमतींवर दिसून आला.

पुढील काळात दरांवर दबाव राहण्याची शक्यता

CNBC च्या अहवालानुसार, यूएस फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर मायकल बार यांनी स्पष्ट केले आहे की, जर महागाई लवकर नियंत्रणात आली नाही, तर मध्यवर्ती बँकेला व्याजदर वाढवण्याचा विचार करावा लागेल. याआधी फेड अध्यक्ष केव्हिन वॉर्श यांनीही व्याजदर वाढीचे संकेत दिले होते. जर व्याजदर वाढले तर गुंतवणूकदारांना सोन्यापेक्षा बाँड यील्ड (रोख्यातून होणारी कमाई) अधिक आकर्षक वाटतात.