Gold Silver Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत होती. आज, ३ सप्टेंबर रोजी या घसरणीला ब्रेक लागला असून सोने आणि चांदी दोन्ही धातूंनी जोरदार उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किमतींचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर पाहायला मिळाला. देशांतर्गत बाजारातही सोने-चांदीचे भाव वेगाने वधारले आहेत. जर तुम्ही ऐन सणासुदीच्या काळात किंवा लग्नसराईसाठी दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजारात जाण्यापूर्वी आजचे ताजे दर तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

आज सोने-चांदीचे दर काय आहेत?

बुलियन वेबसाईटनुसार, २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम सोन्याची किंमत आज १४१० रुपयांनी वधारल्यानंतर भाव १ लाख ५४ हजार ४३० रुपये झाले आहे, तर चांदी देखील २०२० रुपयांनी महाग झाल्याने प्रतिकिलोचा भाव २ लाख ३८ हजार रुपयांवर पोहोचला आहे. आठवड्यापूर्वीच सोन्याची किंमत १ लाख ६३ हजार रुपयांवर गेली होती.

प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे ताजे दर (३ सप्टेंबर २०२६)

शहर२४ कॅरेट सोनं२२ कॅरेट सोनं
दिल्ली १,५३,८३०१,४१,०११
मुंबई १,५४,०९० १,४१,२४९
बंगळुरू १,५४,२१०१,४१,२१०
कोलकाता १,५३,९७० १,४१,१३९
हैदराबाद १,५४,४२०१,४१,५५२

आंतरराष्ट्रीय बाजारात किती वाढ झाली?

आंतरराष्ट्रीय वायदा बाजार म्हणजेच ‘कॉमेक्स’वर आज सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी तेजी नोंदवण्यात आली आहे. सोन्याच्या भावात १.३४ टक्के वाढ झाल्यानंतर किंमत ४,४७३.९० डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात १.६८ टक्के वाढ झाली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी ६६.६६५ डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे.

गुंतवणूकदारांसाठी काय सल्ला?

  • आर्थिक संकट काळात सोन्याला कायम सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ९० डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. परिणामी इंधनदरवाढ होऊन महागाई वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सोन्याच्या किमती वधारतात.
  • अमेरिकेतील फेड बँकेच्या निर्णयाकडे आर्थिक जगताचे लक्ष लागून आहे. फेडने व्याजदर वाढवल्यास सोन्याच्या किमती घसरतात. कारण सोन्यावर कोणताही निश्चित व्याज किंवा परतावा मिळत नाही. याउलट सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणुकीतून निश्चित परतावा मिळतो. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक काढून बाँड्समध्ये गुंतवली जाते.
  • तज्ज्ञांच्या मते आगामी काळात सोन्याच्या किमती वाढतच जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक घसरणीत टप्याटप्याने खरेदी केल्यास फायदा होऊ शकतो.