पीटीआय, नवी दिल्ली : भारताच्या कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआय क्षमतेवर मोठा भर देत, गूगलचे मुख्याधिकारी सुंदर पिचई यांनी बुधवारी भारत-अमेरिकेला थेट जोडणाऱ्या नवीन समुद्राखालील तारांचे (सबसी केबल) जाळे रचणारा उपक्रम आणि त्या बरोबरीने ८०० जिल्ह्यांमधील दोन कोटींहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना क्लाउड पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी भागीदारीदेखील घोषित केली.

दिल्लीतील ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ मध्ये सहभागी होण्यासाठी आलेले पिचई म्हणाले की, आंध्र प्रदेशात अलीकडेच घोषित केलेल्या १५ अब्ज डॉलरच्या ‘एआय हब’मध्ये एक गिगावॅट क्षमतेची कॉम्प्युट सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सबसी केबल गेटवे असेल. हा उपक्रम पूर्ण झाल्यावर, तो भारतातील लोक आणि व्यवसायांना नोकऱ्या आणि अत्याधुनिक एआयचे फायदे प्रदान करेल.

एआयमध्ये भारताच्या असाधारण क्षमतेबाबत विश्वास व्यक्त करताना, पिचई यांनी अमेरिका, भारत आणि दक्षिण गोलार्धातील अनेक ठिकाणी एआय कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी सबसी केबल मार्गाची घोषणा केली. यासोबतच, गूगलने भारतातील प्रमुख कौशल्य कार्यक्रमांचे अनावरण केले, ज्यामध्ये विद्यार्थी आणि सुरुवातीच्या करिअर व्यावसायिकांसाठी गूगल एआय प्रोफेशनल सर्टिफिकेट, ‘कर्मयोगी भारत’शी भागीदारी यांचा समावेश आहे.

८०० जिल्ह्यांमधील २ कोटींहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना आधार देणाऱ्या १८ भारतीय भाषांमधील गूगल क्लाउड मंचासाठी सुरक्षित पायाभूत सुविधा प्रदान करेल. शिवाय ‘अटल टिंकरिंग लॅब्स’सोबत भागीदारी करत, १०,००० हून अधिक भारतीय शाळा आणि वर्गात रोबोटिक्स आणि कोडिंगवर लक्ष केंद्रित करून १.१ कोटी विद्यार्थ्यांना एआय शिक्षित करण्यासाठी सहाय्याचा त्यांनी पुनरूच्चार केला.

पिचई यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. ‘आम्ही आरोग्य सुधारण्यासाठी, सर्व भाषांमध्ये माहितीची उपलब्धता वाढविण्यासाठी, स्टार्टअप्सना समर्थन देण्यासाठी, शेतीसाठी आणि बरेच काही करण्यासाठी भारतातील सर्व स्तरांवर एआयचा वापर करण्याच्या त्यांच्या मोहिमेत गूगल कशी मदत करत आहे यावर चर्चा केली,’ असे त्यांनी या भेटीसंदर्भात ‘एक्स’वरील टिप्पणीत म्हटले आहे.

लक्षावधी डॉलरचे ‘एआय सायन्स चॅलेंज’

संशोधन आणि वैज्ञानिक नवोपक्रमांना चालना, पुढील पिढीतील वैज्ञानिक प्रगतीला गती देण्यासाठी एआय वापरून जागतिक संशोधकांना पाठिंबा देण्यासाठी ३० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची ‘एआय फॉर सायन्स इम्पॅक्ट चॅलेंज’ नावाचा उपक्रम गूगलने सुरू केला आहे. लोकांच्या जीवनावर एआयचा सर्वात मोठा प्रभाव पाडणाऱ्या एआय विकासासाठी गूगल अनेक भारतीय सरकारी संस्था आणि आयआयटी सारख्या संस्थांसह काम करत आहे.