पीटीआय, नवी दिल्ली
जीएसटी परिषदेकडून आगामी बैठकीत, वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दरांमध्ये यापुढे वर्षातून एकदाच बदल करण्याच्या प्रस्तावांचा विचार केला जाणार आहे. तसेच, मंजूर झालेले जीएसटी दरबदल आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच १ एप्रिलपासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयातील सूत्रांनी दिली.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जीएसटी परिषदेने कर दरांमध्ये बदल आणि करांचे सुसूत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पाच स्तरांची म्हणजेच शून्य, ५, १२, १८ आणि २८ टक्के अशी कररचना बदलून शून्य, ५ टक्के, १८ टक्के आणि ४० टक्के अशा प्रमुख कर टप्प्यांची रचना करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या ८ ऑक्टोबर रोजीच्या ५७व्या बैठकीत मात्र जीएसटी दरांमध्ये कोणताही बदल करण्याचा प्रस्ताव चर्चेसाठी नाही. आगामी बैठकीत मर्यादित विषयांवर चर्चा करून कररचनेतील काही बाबी सुलभ करण्यासह संदिग्धता दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.
वर्षातून एकदाच दरबदल
अर्थमंत्रालयातील सूत्रांनुसार, भविष्यातील जीएसटी दरांमध्ये बदल करण्याचे प्रस्ताव वर्षातून एकदाच विचारात घेतले जातील आणि त्यांची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जाईल. त्यामुळे उद्योगांना कररचनेतील बदलांसाठी अधिक स्थिर आणि अंदाज बांधता येण्याजोगे वातावरण मिळण्याची अपेक्षा आहे.
एखादी सवलत मिळण्यापेक्षा कररचनेतील स्थैर्य हे बहुतांश व्यवसायांसाठी अधिक महत्त्वाचे आहे. स्थिर कररचनेमुळे कराराच्या संपूर्ण कालावधीसाठी किंमत निश्चित करणे आणि भांडवली खर्चाचे नियोजन करणे शक्य होते, असे सूत्रांनी सांगितले.
ई-कॉमर्ससाठी ५ टक्के जीएसटी?
ई-कॉमर्स मंचांद्वारे होणाऱ्या वस्तूंच्या वितरणासाठी ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’शिवाय एकसमान ५ टक्के जीएसटी लागू करण्याच्या प्रस्तावाचा समावेश आहे. दररचनेबाबत स्पष्टता आणण्यासाठी आगामी बैठकीत काही प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
महसुलात दुहेरी अंकातील वाढ
गेल्या वर्षी करण्यात आलेली जीएसटी कपात आता सुमारे वर्षभरापासून लागू आहे. या बदलाचा ग्राहक, उद्योग, करमहसूल आणि एकूण अर्थव्यवस्थेला फायदा झाल्याचा अर्थमंत्रालयातील सूत्रांनी दावा केला. यामुळे उपभोगाला चालना मिळाली असून, त्याचबरोबर जीएसटी महसुलातही वाढ झाली आहे. यावर्षी जूनपासून मासिक जीएसटी महसुलात दुहेरी अंकातील वाढ नोंदविली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.
