लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबईः जर्मनीतील अग्रेसर नौवहन कंपनी हापॅग-लॉयडने भारतात २०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची गुरुवारी घोषणा केली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉल्फ हॅबेन जानसेन यांनी पत्रकार परिषदेत भारताबाबत प्रस्तावित धोरणात्मक विस्ताराची माहिती दिली. कंपनीने आतापर्यंत भारतात सुमारे ८०० दशलक्ष डॉलर (साधारण ७,३५० कोटी रुपयांहून अधिक) गुंतवणूक केली आहे.

नियोजित गुंतवणुकीत एकूण २०,००० कोटी रुपयांपैकी निम्मी रक्कम (१०,००० कोटी) जहाज पुनर्वापर (रिसायकलिंग) क्षमतेसाठी, तर उर्वरित निम्मी रक्कम पालघरमधील आगामी वाढवण बंदरात पायाभूत सुविधांसाठी वापरली जाईल. कंपनीने भारत सरकारशी सागरी सहकार्यासाठी सामंजस्य करार केला असून, यामध्ये जहाजांचे पुनर्वापर, ‘रिफ्लॅगिंग’ (भारतीय ध्वजांतर्गत नोंदणी) आणि बंदर विकासाचा समावेश आहे. युरोपीय मानकांनुसार भारतात सुमारे १०० जहाजांच्या पुनर्वापरासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात आपली चार जहाजे भारतीय ध्वजाखाली नोंदणीकृत करण्याचा कंपनीचा विचार आहे. ‘लक्ष्य २०३०’ योजनेअंतर्गत भारतात ३० लाख टीईयू मालवाहतूक हाताळण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. हापॅग-लॉयडची टर्मिनल्स आणि अंतर्गत वाहतूक सेवांचे संचालन पाहणाऱ्या जे एम बक्षी पोर्ट्स अँड लॉजिस्टिक्समध्ये ५० टक्के हिस्सेदारी आहे. आगामी विस्तार नियोजनाच्या अंमलबजावणीत ही भागीदारी कंपनीला उपयुक्त ठरेल.

पश्चिम आशियातील तणावाचा फटका

आखातात चिघळत चाललेल्या युद्धामुळे तांबड्या समुद्रात शिपिंगसाठी तणावाची स्थिती असून, त्यातून कंपनीला दर आठवड्याला ४ ते ५ कोटी डॉलर्सचा अतिरिक्त खर्च सोसावा लागत आहे. मागील दोन आठवड्यांपासून हा खर्चाचा अतिरिक्त बोजा कंपनी सोसत आहे. मात्र आगामी काळात माल वाहतुकीच्या शुल्कात वाढ करून हा भार ग्राहकांवर टाकावा लागेल, असे हापॅग-लॉयडचे मुख्याधिकारी रॉल्फ हॅबेन जानसेन यांनी स्पष्ट केले.