Hero MotoCorp : सततची इंधन दरवाढ पाहता आता वाहन उत्पादक कंपन्या वेगवेगळे प्रयोग करत आहेत. देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी ‘हिरो मोटोकॉर्प’ ऑटोमोबाईल क्षेत्रात एक मोठे पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. कंपनी ३ जून रोजी भारतीय बाजारपेठेत आपली पहिली ‘फ्लेक्स फ्युएल’ मोटरसायकल अधिकृतपणे लाँच करणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या वाहनाचे अनावरण केले जाईल.

काय आहे ‘फ्लेक्स फ्युएल’ तंत्रज्ञान?

फ्लेक्स फ्युएल हे प्रामुख्याने पेट्रोल आणि इथेनॉलचे एक मिश्रण आहे. हे इंधन वापरण्यासाठी वाहनांमध्ये विशेष प्रकारचे इंजिन डिझाइन केले जाते, जे वेगवेगळ्या प्रमाणात मिक्स असलेल्या इथेनॉलवर सहज धावू शकते. पारंपारिक पेट्रोलच्या तुलनेत फ्लेक्स फ्युएलमुळे कच्च्या तेलाचा वापर कमी होतो आणि कार्बन उत्सर्जनात मोठी घट होते, ज्यामुळे हे पर्यावरणपूरक मानले जाते. यामुळे भविष्यात स्वस्त इंधनाचा पर्याय उभा राहू शकतो.

‘हिरो’चे सध्याचे इंधन तंत्रज्ञान

हिरो मोटोकॉर्प सध्या भारतीय बाजारात ‘E20’ इंधनावर आधारित इंटर्नल कंबशन इंजिन दुचाकींची विक्री करते. ‘E20’ इंधन म्हणजे ज्यामध्ये २०% इथेनॉल आणि ८०% पेट्रोलचे मिश्रण असते. याशिवाय, कंपनी आपल्या ‘विडा’ या इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँड अंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकींचीही विक्री करत आहे.

‘हिरो’ची बाजारावर पकड

दुचाकी बाजारातील विक्रीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, हिरो मोटोकॉर्पने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीची देशांतर्गत विक्री वार्षिक आधारावर ८.०९% ने वाढून ६०,६६,०४८ युनिट्सवर पोहोचली आहे, जी आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ५६,११,७५८ युनिट्स होती. विक्रीच्या शर्यतीत हिरोने आपली प्रमुख प्रतिस्पर्धी कंपनी ‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया’ला मागे टाकले आहे. होंडाची देशांतर्गत विक्री ७.९३% वाढीसह ५७,४९,२७५ युनिट्स झाली आहे, जी गेल्या आर्थिक वर्षात ५३,२६,६५२ युनिट्स इतकी होती.

भारताचे आयात बिल कमी होणार?

भारत आपल्या गरजेच्या ८० ते ८५ टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. पश्चिम आशियातील संघर्षामुळे देशाची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. शिवाय कच्च्या तेलाच्या किमती दुप्पट झाल्याने भारताचे आयात बिल अवाढव्य स्वरुपात वाढले आहे. कच्चे तेल आयातीचे बिल कमी करण्यासाठी सरकार इथेनॉल मिश्रणावर भर देत आहे. अशा परिस्थितीत हिरो मोटोकॉर्पचा हा निर्णय देशासाठी गेमचेंजर ठरू शकतो.