Hero MotoCorp flex fuel Splendor : तुम्ही जर सततच्या इंधनदरवाढीमुळे हैराण झाला असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील अग्रगण्य दुचाकी उत्पादक कंपनी ‘हिरो मोटोकॉर्प’ने आपल्या सर्वात लोकप्रिय ‘स्प्लेंडर प्लस’ आणि ‘एचएफ डिलक्स’ या गाड्यांचे ‘फ्लेक्स-फ्युएल’ व्हर्जन अधिकृतपणे बाजारात लाँच केले आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी दिल्लीत आयोजित एका विशेष कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या गाड्यांचे अनावरण करण्यात आले.

काय आहे नव्या गाड्यांची किंमत?

विशेष म्हणजे हिरोने या नव्या फ्लेक्स-फ्युएल गाड्यांच्या किमती अतिशय परवडणाऱ्या ठेवल्या आहेत. एचएफ डिलक्स फ्लेक्स प्युएल (HF Deluxe Flex Fuel) दुचाकीची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत केवळ ७२,७९२ रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर स्प्लेंडर प्लस प्लेक्स फ्युएलची (Splendor+ Flex Fuel) एक्स शोरूम किंमत ८२,७१० रुपये ठेवण्यात आली आहे.

जुलै २०२६ पासून महाराष्ट्रात विक्री सुरू होणार

फ्लेक्स फ्युएल वाहने ही पेट्रोल आणि इथेनॉलच्या वेगवेगळ्या मिश्रणावर (उदा. E85 किंवा थेट E100) धावण्यासाठी विशेष पद्धतीने तयार केली जातात. हिरो मोटोकॉर्पचे नवीन मॉडेल्स पेट्रोल आणि इथेनॉलच्या E20 ते E85 पर्यंतच्या कोणत्याही मिश्रणावर सहज धावू शकतात. या दुचाकी पहिल्या टप्प्यात जुलै २०२६ पासून दिल्लीसह महाराष्ट्रातील काही निवडक भागांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर देशभरात याची विक्री केली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले.

इंजिनमध्ये नेमके काय बदल झाले?

दोन्ही गाड्यांमध्ये हिरोचे पूर्वीचेच ९७.२ सीसीचे सिंगल-सिलेंडर इंजिन वापरण्यात आले आहे. मात्र, उच्च दर्जाच्या इथेनॉलवर चालण्यासाठी त्यात महत्त्वाचे तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. जास्त इथेनॉलमुळे इंजिन खराब होऊ नये म्हणून यामध्ये सुधारित ईसीयू कॅलिब्रेशन, अपग्रेड केलेले फ्युएल-सिस्टम घटक, एक स्वतंत्र विशेष फ्युएल पंप आणि दुय्यम फ्युएल फिल्टर बसवण्यात आले आहेत.

पूर्णपणे स्वदेशी गाडी

या दोन्ही फ्लेक्स-फ्युएल गाड्यांचे संपूर्ण संशोधन आणि विकास जयपूरमधील त्यांच्या ‘सेंटर फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी’ येथे करण्यात आला आहे. या गाड्यांमध्ये परदेशातून आयात केलेले सुटे भाग नगण्य असून, ही निर्मिती पूर्णपणे ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला बळ देणारी असल्याचे हिरो मोटोकॉर्पने म्हटलं आहे.

पेट्रोल-डिझेलपेक्षा स्वस्त मिळणार?

सध्या देशात पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलचे मिश्रण केलं जात आहे. भविष्यात जेव्हा १०० टक्के इथेनॉलवर वाहने धावतील तेव्हा नक्कीच इंधनाचे दर परवडणारे असतील. भारतात १ लीटर इथेनॉलची किंमत साधारणपणे ५२ ते ६५ रुपये आहे. केंद्र सरकारने इंधन मिश्रणासाठी (E20 पेट्रोल) खरेदी केल्या जाणाऱ्या इथेनॉलचे दर प्रतिलिटर ५७.९७ रुपयांपर्यंत निश्चित केले आहेत. त्यामुळे इंधनदर थेट निम्म्याने कमी होण्याची शक्यता आहे.