Ashok Vada Pav Ranked Among World’s Most Iconic Sandwiches by TasteAtlas : मुंबई म्हटलं लोकल, घाईत असणारे लोक आणि हातात वडापाव हे चित्र डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही या शहरातील कोणत्याही गल्लीबोळात जा, खमंग तळलेल्या वडापावच्या सुगंधाने मनात खाण्याची इच्छा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. एका सेलिब्रिटीचा दर्जा मिळालेला हा साधा स्नॅक म्हणजेच पावामध्ये ठेवलेला गरम बटाटा वडा आज मुंबईची ओळख बनला आहे. पण, या वडापावच्या प्रवासामागे एका ध्येयवेड्या मराठी माणसाची कल्पकता आहे. ज्याने मुंबईला केवळ एक खाण्याचा उत्तम पर्यायच दिला नाही, तर एका मोठ्या व्यावसायिक साम्राज्यालाही जन्म दिला.

कल्पकतेतून वडापावचा जन्म

स्वातंत्र्यानंतर मुंबई वेगाने देशाचे आर्थिक केंद्र बनत होती. देशभरातून लोक रोजगार, व्यापाराच्या संधी शोधत मुंबईत पोहोचत होते. १९६० च्या दशकातील या स्थलांतरासोबत येथील खाद्यसंस्कृती देखील कुस बदलत होती. शहरात दक्षिण भारतीय हॉटेल्सचा दबदबा वाढत होता. डोसा, इडली हे मुंबईकरांच्या सकाळच्या नाश्त्याचा मुख्य भाग बनत होते. याच काळात, बाळासाहेब ठाकरेंच्या मराठी अस्मितेच्या आवाहनाने प्रेरित होऊन अशोक वैद्य नावाच्या एका मराठी तरुणाने दादर रेल्वे स्टेशनबाहेर पोहे आणि बटाटा वडा विकणारी एक छोटी गाडी सुरू केली. त्यांच्या गाडीच्या शेजारीच एक ऑम्लेट-पाव विकणारा स्टॉल होता. एक दिवस सहज प्रयोग म्हणून अशोक काकांनी बटाटा वडा पावाच्या मध्यभागी ठेवला आणि पुढे इतिहास घडला.

मिल कामगारांसाठी ठरले ‘वरदान’

अशोक वैद्य यांनी पावामध्ये केवळ मसालेदार बटाटा वडा नाही ठेवला तर सोबतीला तिखट लसूण-मिरचीची चटणी लावली. मुंबईच्या खाद्यसंस्कृतीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. खाण्यासाठी सोयीस्कर, खिशाला परवडणारा आणि चवदार असलेला हा ‘वडापाव’ दादर स्टेशनवरून ये-जा करणाऱ्या मिल कामगारांसाठी वरदान ठरला. कमी पैशात पोटभर अन्न देणारा हा एक उत्तम पर्याय बनला.

पुढची पिढी चालवतेय वारसा

अशोक वैद्य यांच्यानंतर आज त्यांचा मुलगा नरेंद्र वैद्य हे आपल्या वडिलांचा हा ऐतिहासिक वारसा पुढे चालवत आहेत. व्यवसायाचा विस्तार करण्याची मोठी संधी असतानाही, त्यांनी वडिलांची साधी पद्धत बदललेली नाही. आजही ते त्याच मूळ स्टीलच्या ट्रेमध्ये वडापाव सर्व्ह करतात, ज्या ट्रेमधून त्यांच्या वडिलांनी सुरुवात केली होती.

रोज ५०,००० रुपयांची कमाई

‘अशोक वडापाव’ हा कीर्ती कॉलेज वडापाव म्हणूनही प्रसिद्ध आहे. या वडापावची कीर्ती केवळ मुंबईपुरती मर्यादीत राहिली नाही. तर तो या शहराचा सांस्कृतिक अनुभव बनला आहे. अनेक बाहेरुन आलेले पर्यटकही या वडापावचा आस्वाद घेण्यासाठी दादरला पोहचतात. या स्टॉलवर दररोज सुमार २००० वडापाव विकले जातात. दिवसातील १० तास हा स्टॉल सुरू असतो. सरासरी प्रत्येक ग्राहक ४ वडापावची ऑर्डर देतो, ज्यातून या छोट्या गाडीवर दररोज ५०,००० रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमतो.

अधिकृत सन्मानापासून वंचित, पण जगभर डंका

मुंबईच्या आणि पर्यायाने जगाच्या खाद्यसंस्कृतीला इतकी मोठी देणगी देणाऱ्या अशोक वैद्य यांना त्यांच्या हयातीत कधीही यासाठी विशेष सन्माम मिळाला नाही. पण, आज जगभरातील हॉटेल्समध्ये तुम्हाला वडापाव खायला मिळतो. पण, आता जगाने या स्नॅकची दखल घेतली आहे. मुंबईतल्या अशोक वडापावला TasteAtlas च्या बेस्ट सँडविचेसच्या यादीत २५ वं स्थान मिळालं आहे. यात वडापावला ४.१ स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. शिवसेनेचा उदय झाल्यानंतर अशोक वडापाव सुरु झाला आणि त्याची प्रसिद्धी लोकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली असंही TasteAtlas ने नमूद केलं आहे.