Home appliances price hike October 1 : आगामी दिवाळी आणि सणासुदीच्या काळापूर्वीच ग्राहकांना महागाईचा शॉक बसणार आहे. गुरुवार १ ऑक्टोबरपासून एअर कंडिशनर (AC), एलइडी टीव्ही, वॉशिंग मशिन आणि इतर गृहोपयोगी उपकरणांच्या किमती ५ ते ८ टक्क्यांनी महाग होणार आहेत. ब्लू स्टार, गोदरेज अप्लायन्सेस, हायर यांसारख्या प्रमुख कंपन्यांनी आधीच वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ४ ते १० टक्क्यांपर्यंत भाववाढ जाहीर केली आहे. अशात सणासुदीत खरेदी करताना ग्राहकांना जास्त पैसे मोजवे लागणार आहेत.

कोणत्या उत्पादनांचे भाव किती वाढणार?

एसीच्या किमतीत ५ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. काही कंपन्यांनी यामध्ये थेट १० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. तसेच वॉशिंग मशिन आणि रेफ्रिजरेटर या उत्पादनांच्या किमतीत ३ ते ४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. लहान आकाराच्या टीव्हीच्या किमतीत तब्बल २० टक्क्यांपर्यंत, तर मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीत १० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. ब्लू स्टार, गोदरेज अप्लायन्सेस, हायर, डायकिन आणि बॉश होम कम्फर्ट यांसारख्या प्रमुख कंपन्यांनी आधीच वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ४ ते १० टक्क्यांपर्यंत भाववाढ जाहीर केली आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाने १ ऑक्टोबरपासून एसीच्या किमती ५ ते ७ टक्क्यांनी वाढवल्या आहेत, तर इतर उत्पादनांवर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

भाववाढीमागे नेमकी कारणे कोणती?

  • उद्योजकांच्या मते, जागतिक घडामोडी आणि युद्धाच्या परिस्थितीमुळे कच्च्या मालाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. विशेष करुन एसी, रेफ्रिजरेटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या तांब्यांचे भाव कडाडले आहे. गेल्या वर्षी ८,००० ते ९,००० डॉलर प्रति मेट्रिक टन असणारा तांब्याचा भाव आता १४,५०० डॉलरवर पोहोचला आहे. एका एसीमध्ये ३ ते ४ किलो तांबे लागते, ज्यामुळे उत्पादन खर्च खूप वाढला आहे.
  • गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचे कमलनंदी यांनी सांगितले की, मागील भाववाढीनंतर कच्च्या मालाच्या किमतीत पुन्हा ८ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे भाववाढ करण्याशिवाय पर्याय नाही. डॉलर मजबूत झाल्यामुळे आयात महाग झाली आहे आणि मालवाहतूक खर्चही वाढला आहे.

सणासुदीच्या खरेदीवर काय परिणाम होणार?

सणासुदीचा काळ हा या उद्योगासाठी वार्षिक विक्रीचा ३० ते ४० टक्क्यांहून अधिक हिस्सा मानला जातो. मात्र, वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. बऱ्याच डीलर्स आणि वितरकांनी भाववाढीपूर्वीच मोठा साठा करून ठेवला आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत ग्राहकांना जुन्याच किमतीत उत्पादने मिळू शकतात. मात्र, दिवाळीनंतर नवीन वाढीव किमती लागू होणे निश्चित आहे. हायर इंडियाचे अध्यक्ष एनएस सतीश यांनी सांगितले की, कंपनी १ ऑक्टोबरनंतर ५ टक्के, त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये आणखी भाव वाढवण्याचा विचार करत असून, एकूण १५ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.