Physicswallah Vs Byjus : एडटेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘फिजिक्सवाला’च्या शेअर्समध्ये गुरुवारी (२८ मे) बीएसईवर ५.१ टक्क्यांची शानदार उसळी पाहायला मिळाली. यानंतर कंपनीचे बाजार भांडवल सुमारे ३२,०१४ कोटी रुपये इतके झाले आहे. तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वीच ‘बायजू’चे संस्थापक बायजू रवींद्रन यांना सिंगापूरमधील एका न्यायालयाने ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. भारतीय एज्युटेक क्षेत्राच्या इतिहासात ‘फिजिक्सवाला’चे यश आणि ‘बायजू’ पतन हा कॉर्पोरेट क्षेत्रासाठी मोठा धडा आहे. अब्जावधी डॉलर्सचे परदेशी फंडिंग, आक्रमक मार्केटिंग आणि जागतिक ब्रँडिंग असूनही बायजू आज दिवाळखोर झाली आहे. दुसरीकडे, अत्यंत साध्या युट्यूब चॅनेलपासून सुरुवात करणारे अलख पांडे यांनी ‘फिजिक्सवाला’ला यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे.

कसा झाला बायजूचा जन्म

‘फिजिक्सवाला’चे अलख पांडे जेव्हा छोट्याश्या खोलीत विद्यार्थ्यांची शिकवणी घेत असतील तेव्हा २०११ मध्ये बायजू रवींद्रन यांनी ऑनलाईन शिक्षणाचा पाया रचला. बायजू रवींद्रन यांनी सुरुवातीला नर्सरी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी ‘बायजू’ प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. सुरुवातीला या क्षेत्रात किरकोळ युट्यूबर सोडले तर कोणीही मोठा खेळाडू नव्हता. पण, विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड होती. त्यामुळे या प्रवासाला अपेक्षेपेक्षा जास्त वेग मिळाला आणि २०१९ पर्यंत ही कंपनी १ अब्ज डॉलर्स (सुमारे ९,६०० कोटी रुपये) मूल्यांकनासह देशातील पहिली ‘युनिकॉर्न एडटेक कंपनी’ बनली.

युट्यूब ते ‘फिजिक्सवाला’ची सुरुवात

युट्यूबवरुन स्पर्धा परीक्षांची शिकवणी घेणारे अलख पांडे यांनी प्रतीक माहेश्वरी यांच्यासोबत २०२० मध्ये ‘फिजिक्सवाला’ कंपनीची स्थापना केली. सध्या ही भारतातील अग्रगण्य एडटेक कंपन्यांपैकी एक आहे, जी ऑनलाइन तसेच देशभरात अनेक ऑफलाइन कोचिंग सेंटर्स चालवते.

‘फंडिंग’ पेक्षा ‘प्रॉडक्ट’ आणि विद्यार्थ्यांवर भर

बायजूचे मुख्य लक्ष हे परदेशी गुंतवणूकदारांकडून अब्जावधी डॉलर्सचे फंडिंग गोळा करणे आणि एकामागून एक कंपन्या अधिग्रहित करणे यावर होते. याउलट, अलख पांडे यांनी सुरुवातीची अनेक वर्षे केवळ आणि केवल ‘कंटेन्ट’ आणि विद्यार्थ्यांच्या विश्वासावर लक्ष केंद्रित केले. जोपर्यंत विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होत नाही, तोपर्यंत व्यवसाय वाढवायचा नाही, हे धोरण त्यांनी पाळले.

परवडणारे शिक्षण : दोन्हीतील मोठा फरक

बायजू आणि इतर अनेक एज्युटेक कंपन्यांचे कोर्सेस ५०,००० ते १ लाख रुपयांपर्यंत असायचे, जे खरेदी करण्यासाठी पालकांना कर्ज काढावे लागायचे. याउलट, फिजिक्सवालाने अवघ्या २,००० ते ४,००० रुपयांमध्ये आयआयटी-जेईई आणि नीट सारख्या कठीण परीक्षांचे दर्जेदार कोर्सेस उपलब्ध करून दिले. यामुळे भारतातील ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत त्यांची पोहोच निर्माण झाली.

विद्यार्थ्यांची नस..

बायजूवर अनेकदा आरोप झाले की, त्यांच्या सेल्स टीमने पालकांवर दबाव आणून कोर्सेस विकले. याउलट, अलख पांडे स्वतः शिक्षक असल्याने त्यांना विद्यार्थी आणि पालकांची नस माहिती होती. त्यामुळे त्यांनी स्वतःला ‘बिझनेसमन’ म्हणून कधीही समोर आणले नाही. आजही अलख पांडे म्हटलं की एक शिक्षकच समोर उभा राहतो.

ऑनलाईन आणि ऑफलाईनचा योग्य मेळ

कोरोना काळ संपल्यानंतर जेव्हा विद्यार्थी पुन्हा वर्गात परतू लागले, तेव्हा बायजूला हा बदल वेगाने स्वीकारता आला नाही. फिजिक्सवालाने मात्र अत्यंत धोरणात्मक पाऊल टाकत आपले ‘विद्यापीठ’ हे ऑफलाईन सेंटर्स सुरू केले. त्यांच्या ऑफलाईन सेगमेंटमध्ये आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत ५३.९% ची मजबूत वाढ झाली आहे. त्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मॉडेल्सचा समतोल साधला.

खर्च नियंत्रणात ठेवण्याची शिस्त

बायजूने जागतिक स्तरावर फुटबॉल वर्ल्ड कपचे प्रायोजकत्व घेणे, शाहरूख खान आणि मेस्सी सारख्या बड्या सेलिब्रिटींना ब्रँड अ‍ॅम्बेसेडर करणे यावर हजारो कोटी रुपये खर्च केले. फिजिक्सवालाने मात्र सेलिब्रिटींवर खर्च न करता ‘अ‍ॅसेट-लाइट’ मॉडेलवर भर दिला. त्यामुळेच आज एडटेक क्षेत्रातील मंदीच्या काळातही त्यांची कंपनी नफ्यात आहे.

सध्याची स्थिती काय?

फिजिक्सवाला कंपनीने बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर आपले आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या भक्कम निकालानंतर गुंतवणूकदारांनी खरेदीला पसंती दिली, ज्यामुळे शेअरने ११७.६५ चा इंट्रा-डे उच्चांक गाठला. चौथ्या तिमाहीत कंपनीच्या ऑपरेशन्समधून मिळणाऱ्या महसुलात ५०.७ टक्क्यांची दमदार वाढ झाली आहे. कंपनीचा महसूल ९१८.८ कोटींवर पोहोचला आहे, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ६०९.६ कोटी रुपये इतका होता.