Richest Investors In India: जागतीक आणि देशांतर्गत घटकांमुळे भारतीय शेअर बाजारात गेल्या वर्षभरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी लाखो कोटी रुपये गमावले आहेत. अशातच ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६’ मध्ये देशातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
‘हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६’मध्ये एका महिला गुंतवणूकदाराने अव्वल स्थान पटकावले आहे. तसेच, बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीच्या धोरणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींचाही यात समावेश आहे.
रेखा राकेश झुनझुनवाला
या यादीत देशातील अनेक दिग्गज गुंतवणूकदारांचा समावेश आहे. गुंतवणूकदारांच्या श्रेणीत रेखा राकेश झुनझुनवाला आघाडीवर असून, त्यांची एकूण संपत्ती ७५,८०० कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी आहेत. राकेश झुनझुनवाला यांना शेअर बाजारातील ‘बिग बुल’ म्हणून ओळखले जात असत.
रॉनी स्क्रूवाला
१२,९०० कोटी रुपयांच्या निव्वळ संपत्तीसह रॉनी स्क्रूवाला हे रेखा झुनझुनवाला यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत गुंतवणूकदार आहेत.
आकाश भन्साळी
या यादीत १२,२०० कोटी रुपयांच्या निव्वळ संपत्तीसह आकाश भन्साळी तिसऱ्या स्थानावर आहेत.
मुकुल अग्रवाल
मुकुल अग्रवाल ७,७०० कोटी रुपयांच्या एकूण निव्वळ संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत.
नेमिष शाह
श्रीमंत गुंतवणूकदारांच्या यादीत पाचव्या स्थानावर नेमिष शाह आहेत, ज्यांची निव्वळ संपत्ती ४,२०० कोटी रुपये आहे.
आशिष कचोलिया
शेअर बाजाराच्या संबंधित बातम्यांमध्ये अनेकदा आशिष कचोलिया हे नाव आपल्याला वाचायला मिळते. ३,४०० कोटी रुपयांच्या निव्वळ संपत्तीसह ते सहाव्या क्रमांकावर आहेत.
नील सिंघानिया
नील सिंघानिया हे नाव जास्त जणांच्या परिचयाचे नसले तरी श्रीमंत गुंतवणूकदारांच्या यादीत ते ३,३०० कोटी रुपयांसह सातव्या स्थानावर आहेत.
आशिष धवन आणि मधुसूदन केला
आशिष धवन आणि मधुसूदन केला प्रत्येकी ३,००० कोटी रुपयांच्या निव्वळ संपत्तीसह संयुक्तपणे आठव्या स्थानावर आहेत, तर अनिल कुमार गोयल १० व्या स्थानावर आहेत.
