मुंबई : यंदा जसे पूर्वअंदाज व्यक्त केले जात आहेत, त्याप्रमाणे पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्यास ते भारतात महागाईत जास्तीची भर घालणारे कारण ठरू शकते; याचा ग्राहक किंमत निर्देशांकावर अंदाजे ०.४ टक्क्यांचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आयसीआयसीआय बँकेने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालाने व्यक्त केली.

भारतीय हवामान विभागाने ‘एल निनो’च्या तीव्र प्रभावामुळे, यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मागे वळून पाहिल्यास ‘एल निनो’च्या स्थितीमुळे सरासरीपेक्षा कमी किंवा अपुरा पाऊस पडण्याची शक्यता सुमारे ७० टक्के इतकी असते. पावसातील इतकी मोठी तूट ही पीक उत्पादन व महागाईसाठी धोकादायक असल्याची भीती अहवालाने व्यक्त केली आहे.

एकूण अन्नधान्यांचा किरकोळ महागाई दर निर्धारणात ३४.८ टक्के प्रभाव असला तरी, पावसावर अवलंबून असलेल्या पिकांचा एकूण महागाईत वाटा ६.१ टक्के इतका लक्षणीय आहे. त्यामुळे यंदा मुख्यत्वे खरीपातील, पावसावर अवलंबून असलेल्या पिकांचेच नुकसान व उत्पादन घटण्याची शक्यता पाहता अहवालाने हा इशारा दिला आहे.

अहवालाने अन्नधान्य महागाई वाढून ४.७ टक्के या पातळीवर जाईल असे भाकित केले आहे. पश्चिम आशियातील संघर्षापूर्वी जानेवारी ते मार्च या कालावधीत अन्नधान्य महागाईची सरासरी ३.२ टक्के होती. २०२५ मध्ये याच तिमाहीत ही सरासरी ७.३ टक्के इतकी होती. अन्नपदार्थांच्या किमतींमध्ये वाढ होण्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत आणि पुढील काळात त्यात आणखी वाढ होण्याचा धोका सुस्पष्ट आहे.

अहवालाने इतिहासाचा मागोवा घेत सूचित केले आहे की, पाऊस सरासरीपेक्षा कमी राहिलेल्या वर्षांमध्ये अन्नधान्य महागाईची सरासरी ५.७ टक्के इतकी उच्च राहिली आहे. याउलट, ज्या वर्षांमध्ये पाऊस सरासरीइतका झाला, त्या वर्षांमध्ये ही सरासरी ४.४ टक्के इतकी होती. परिणामी, आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी रिझर्व्ह बँकेकडून वर्तवण्यात आलेला किरकोळ महागाईचा ४.५ टक्क्यांचे अनुमान हे प्रत्यक्ष जास्त राहण्याचा धोका मोठा असल्याचे अहवाल नमूद करतो.

अन्नधान्य महागाईचा वेग वाढण्याची कारणे देताना, अहवालाने खतांच्या वाढलेल्या किमती आणि प्रतिकूल जागतिक कल पाहता त्यावर आणखी दबाव येऊ शकतो, असा इशाराही अहवालाने दिला आहे. या परिणामी केवळ भारतातच नव्हे, तर २०२६ मध्ये जागतिक अन्नधान्य महागाई वाढू शकते, आणि तिचा दणका हा २०२२ सालाप्रमाणेच (जेव्हा महागाई दर १४ टक्क्यांवर होता) असू शकते, असे अहवालाने नमूद केले आहे.

या आधी अपुरा पाऊस झालेल्या २०१५-१६ आर्थिक वर्षामध्ये कृषी उत्पादनात २.६ टक्क्यांची घट झाली होती; याउलट, त्यानंतरच्या पाच वर्षांमध्ये जेव्हा पावसाची स्थिती सुधारली, तेव्हा कृषी उत्पादनात सरासरी ४.४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती. पिकांमध्ये, भरड धान्ये, कडधान्ये, तेलबिया आणि मसाले यांसारख्या पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण त्यांचे सिंचन क्षेत्र १९ ते ४४ टक्क्यांपर्यंत कमी आहे. याउलट, उत्तम सिंचन आणि अन्नसाठ्याच्या पाठिंब्यामुळे तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन कमी अस्थिर आहे.