IDBI Bank Privatization Prem Watsa : तुमचं जर आयडीबीआय बँकेत खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, तुमच्या बँकेची मालकी आता देशाबाहेर जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आणि ‘एलआयसी’ (LIC) IDBI बँकेतील आपली ६०.७२% भागीदारी विकणार असून, यासाठी कॅनडाच्या नामांकित ‘फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्स’ या परदेशी कंपनीच्या सुधारित प्रस्तावाला सरकारने हिरवा कंदील दिल्याची सूत्रांची माहिती आहे. या बातमीनंतर कॅनडात राहणारे एक भारतीय अब्जाधीश चर्चेत आले आहेत. शिक्षणासाठी कॅनडात गेलेले आणि उदरनिर्वाहासाठी कधीकाळी दारोदारी जाऊन घरगुती वस्तू विकणारे आज चक्क आयडीबीआय बँकेचे नवे मालक होणार आहेत.

IDBI बँक खरेदी करणारा भारतीय कोण?

आयडीबीआय बँक विकत घेण्यासाठी ५३ हजार कोटींची बोली लावणाऱ्या फेअरफॅक्स या कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ प्रेम वत्स आहेत. सध्या ते कॅनेडियन नागरिक असले तरी त्यांचे मूळ भारतातच आहे. प्रेम वत्स यांचा जन्म १९५० मध्ये हैदराबाद येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी देशातील नामांकित संस्था ‘आयटीआय मद्रास’ मधून १९७१ मध्ये केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. १९७० च्या दशकात ते पुढील शिक्षणासाठी कॅनडाला गेले, तेव्हा त्यांच्या खिशात अवघे ८ डॉलर (आजच्या हिशोबाने ६००-७०० रुपये) होते.

दारोदारी जाऊन वस्तूंची विक्री

प्रेम वत्स यांचा कॅनेडातील प्रवास सोपा नव्हता. शिक्षण आणि इतर खर्च भागवण्यासाठी त्यांनी तिथं दारोदारी जाऊन वस्तू विकायला सुरुवात केली. या कामातूनच त्यांना व्यवसायाची समज आली. हेच काम करत असताना त्यांनी ‘वेस्टर्न ओंटारियो युनिव्हर्सिटी’मधून एमबीए पूर्ण केलं. १९७४ मध्ये एका इन्शुरन्स कंपनीत पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. इथे त्यांना आर्थिक बाजाराचे बारकावे शिकायला मिळाले. १९८५ मध्ये त्यांनी ‘फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्स’ची पायाभरणी केली. आज या कंपनीचे मार्केट कॅप अब्जावधी डॉलर्समध्ये आहे.

त्यांना ‘कॅनडाचे वॉरेन बफे’ का म्हणतात?

जगातील दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे ज्याप्रमाणे ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ म्हणजेच भविष्यात चालणाऱ्या पण सध्या स्वस्त असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ओळखले जातात, तीच शैली प्रेम वत्स यांची आहे. ते सट्टेबाजी किंवा झटपट श्रीमंत होण्याच्या फंदात पडत नाहीत.

IDBI बँकेच्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?

  • बँकेच्या मालकी हक्कात बदल होत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या मनात अनेक शंका आहेत. मात्र, ग्राहकांनी काळजी करण्याचे कारण नाही.
  • खासगीकरणानंतरही ग्राहकांचा बँकेत ठेवलेला प्रत्येक रुपया सुरक्षित राहील. रिझर्व्ह बँकेच्या कडक नियमांमुळे ग्राहकांच्या ठेवींना कोणताही धोका असणार नाही.
  • फेअरफॅक्सच्या आगमनामुळे बँकेची कार्यपद्धती अधिक व्यावसायिक होईल. बँकेचे मोबाईल ॲप, इंटरनेट बँकिंग आणि इतर डिजिटल सेवा अधिक प्रगत होतील.