IDBI Bank Stake Sale : आयडीबीआय बँकेतील बहुसंख्य हिस्सा कॅनडातील फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जला विकण्याच्या प्रस्तावाला युनायटेड फोरम ऑफ आयडीबीआय ऑफिसर्स अँड एम्प्लॉईज या कर्मचारी संघटनेने गुरुवारी विरोध केला. या विक्रीची प्रक्रिया तातडीने स्थगित करून संसदेच्या देखरेखीखाली संपूर्ण व्यवहाराचा आढावा घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

बाजारातील अस्थिर परिस्थितीत बँकेच्या हिस्साविक्रीचा निर्णय घाईने घेणे योग्य नसून, त्यामागील कारणे पुरेशा प्रमाणात स्पष्ट करण्यात आलेली नाहीत, असे संघटनेचे म्हणणे आहे. बँकेच्या मालमत्ता, संस्थात्मक क्षमता, ग्राहकांशी असलेले संबंध, भविष्यातील उत्पन्नाची क्षमता आणि धोरणात्मक महत्त्व यांचे योग्य मूल्यांकन न झाल्यास बँकेची विक्री कमी किमतीत होण्याची भीती संघटनेने व्यक्त केली.

आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाविरोधात आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना संघटनेचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर यांनी व्यवहाराच्या मूल्यांकन प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले. बँकेच्या मूल्यांकनाची पद्धत, त्यासाठी वापरलेली गृहीतके, स्थावर मालमत्ता आणि अन्य मालमत्तांचे मूल्यांकन तसेच विक्रीची किंमत स्वीकारण्यामागील आधार सरकारने सार्वजनिक करावा, अशी मागणी त्यांनी केली.

खरेदीदाराच्या पार्श्वभूमीची तपासणी करण्याची मागणी

फेअरफॅक्सची मालकी रचना, आर्थिक क्षमता, नियामक नियमांचे पालन करण्याचा इतिहास आणि कंपनीच्या मूळ देशातील वादग्रस्त बाबींबाबतचे ठोस पुरावे यांचीही पारदर्शक तपासणी व्हावी, असे संघटनेने म्हटले आहे. मोठ्या भारतीय बँकेचे नियंत्रण खासगी कंपनीकडे हस्तांतरित करताना केवळ नियामक मंजुरी पुरेशी नसून, त्याबाबत सरकारने जनतेला उत्तरदायी राहणे आवश्यक असल्याचे तुळजापूरकर यांनी नमूद केले.

आयडीबीआय बँकेत एकूण १९,१०८ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची संख्या ९,५०० आहे. बँकेत ६,९११ महिला कर्मचारी आणि ८८४ दिव्यांग कर्मचारीही कार्यरत आहेत.

संसदेला दिलेल्या आश्वासनाचा दाखला

आयडीबीआयचे बँकिंग कंपनीत रूपांतर होत असताना तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री जसवंत सिंह यांनी संसदेत सरकारचा हिस्सा किमान ५१ टक्के राहील, असे आश्वासन दिले होते. सध्याचा निर्णय त्या आश्वासनाचे पालन कसा करतो, याचे स्पष्टीकरण सरकारने संसद आणि जनतेला दिले पाहिजे, असे तुळजापूरकर म्हणाले.

केंद्र सरकारने १४ ऑक्टोबर रोजी आयडीबीआय बँकेतील ६०.७२ टक्के हिस्सा कॅनडातील फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जला सुमारे ५३ हजार कोटी रुपयांना विकण्यास मंजुरी दिली होती. या व्यवहारात केंद्र सरकारचा ३०.४८ टक्के हिस्सा सुमारे २६,६२० कोटी रुपयांना, तर भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) ३०.२४ टक्के हिस्सा सुमारे २६,४४० कोटी रुपयांना विकला जाणार आहे. कॅनडातील अब्जाधीश प्रेम वत्सा यांच्या नेतृत्वाखालील फेअरफॅक्स प्रत्येक समभागासाठी ८१ रुपये देणार आहे.