IDBI Bank Stake Sale Nirmala Sitharaman and Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आयडीबीआय बँकेतील हिस्सा विक्री करण्यास मंजुरी दिल्यानंतर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, सार्वजनिक बँका म्हणजे विकण्यासाठी असलेली मालमत्ता नसून, त्या राष्ट्र उभारणीची साधने आहेत, असे म्हटले होते. राहुल गांधींच्या या टीकेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, काँग्रेसने बँकांचा वापर वैयक्तिक मालमत्तेसारखा केला होता.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या पोस्टच्या सुरुवातीला म्हटले, “आपल्या सर्वांना माहीत आहे की, काँग्रेसने बँका आणि वित्तीय संस्थांचा वापर स्वतःच्या खाजगी मालमत्तेसारखा कसा केला आहे. त्यांनी बँक कर्मचाऱ्यांवर दबाव आणून, कर्ज देण्याबाबतच्या नियमांना बगल देत, आपल्या मर्जीनुसार कर्ज वाटप करायला लावले आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “मोदी सरकार आले तेव्हा आयडीबीआय बँकचे परिस्थिती अत्यंत दयनीय होती. कारण या बँकेला काँग्रेसशी जवळचे संबंध असलेल्या मोठ्या व्यावसायिक समूहांना कर्ज देण्यास भाग पाडले गेले होते. व्हिडिओकॉन, विनसम, एबीजी शिपयार्ड, आणि किंगफिशर सारख्या कंपन्यांना दिलेली कर्जे बुडीत निघाली, ज्यामुळे आयडीबीआय बँकेचे प्रचंड नुकसान झाले.”
“काँग्रेसच्या काळातील बँकिंग व्यवस्थेत प्रभावशाली लोकांसाठी एक ‘फोनबुक’ होती, तर सामान्य नागरिकांसाठी नियमावली होती. ओळखी-पाळखीच्या आधारे चालणाऱ्या बँकिंगचा तो काळ आता संपला आहे. आता सामान्य लोकांना सहजपणे कर्ज उपलब्ध होत आहे आणि बँक कर्मचाऱ्यांवरही फोन कॉलद्वारे कर्ज मंजूर करण्यासाठी कोणताही दबाव नाही”, असे निर्मला सितारामन पोस्टच्या शेवटी म्हणाल्या.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
“काँग्रेसच्या काळात देशातील उद्योग उभारणीसाठी IDBI बँक स्थापन झाली. मोदींच्या काळात आधी बोली पाहिली गेली आणि नंतर दर निश्चित करण्यात आला. काँग्रेसच्या काळात बँका उभ्या राहात होत्या, मोदींच्या काळात विकल्या जात आहेत. मी आयडीबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांबरोबर आहे”, असं राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
