IDBI Bank Sale : आयडीबीआय बँकेच्या धोरणात्मक विक्रीसाठी निश्चित केलेली राखीव किंमत ही बोली लावण्याच्या दुसऱ्या फेरीतून कमी करण्यात आलेली नाही. तर सुधारित प्रक्रियेमुळे प्राप्त झालेल्या बोलीतून प्रत्यक्षात ३,९१७ कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई झाली आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्रालयाने शुक्रवारी दिले. बँकेच्या विक्री प्रक्रियेबाबत आरोप व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा करण्यात आला.
पहिल्या फेरीत प्राप्त झालेल्या बोलींना मंजुरी मिळाली नसल्याने त्या संपुष्टात आल्या. त्यामुळे राखीव किमतीत कोणताही बदल करण्याचा प्रश्नच नव्हता, असे मंत्रालयाने म्हटले आहे. दुसऱ्या म्हणजेच सर्वोत्तम बोलीच्या फेरीसाठी आवश्यक प्रक्रिया निश्चित करण्याचे अधिकार निर्गुंतवणुकीवरील सचिवांच्या मुख्य गटाला देण्यात आले होते. आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने या गटाला धोरणात्मक व्यवहारांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रक्रियात्मक बदल करण्याचे अधिकार दिले होते.
मंत्रालयाच्या माहितीनुसार, पहिली बोली प्रक्रिया २०२५-२६ या आर्थिक वर्षात गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या (दीपम) मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबविण्यात आली होती. गुंतागुंतीच्या धोरणात्मक व्यवहारांमध्ये आवश्यक लवचिकता ठेवण्याची तरतूद या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आहे. बोलीदारांना कोणतीही पूर्वनिश्चित संदर्भ किंमत देण्यात आली नव्हती. प्रत्येक बोलीदार कंपनीचे स्वतंत्र मूल्यांकन करून गोपनीय स्वरूपात बोली सादर करतो. या बोलींची व्यवहार्यता तपासण्यासाठी स्वतंत्र संस्थांकडून मूल्यांकन केले जाते.
आयडीबीआय बँकेचे मूल्यांकन करण्यासाठी दोन स्वतंत्र सल्लागार संस्थांची नियुक्ती करण्यात आली होती. या संस्थांनी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून बँकेचे मूल्यांकन केले. व्यवसायाच्या मूल्यांकनासाठी बाजारातील समतुल्य कंपन्यांच्या गुणोत्तरांचा आधार घेण्यात आला. यामध्ये सूचिबद्ध सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा तुलनेसाठी वापर करण्यात आला. तर मालमत्तेच्या मूल्यांकनात वादग्रस्त कर मागण्यांसह विविध घटकांचा विचार करण्यात आला.
धोरणात्मक निर्गुंतवणूक नव्हे तर ‘धोरणात्मक पुनर्रचना’
आयडीबीआय बँकेच्या प्रस्तावित खासगीकरणावरून बँकेतील कर्मचारी संघटनांनी आरक्षणाच्या तरतुदी, सेवाशर्तींचे संरक्षण आणि निवृत्तिवेतन लाभांबाबत चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्रालयाचे स्पष्टीकरण महत्त्वाचे मानले जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने १४ ऑक्टोबर रोजी कॅनडातील फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जच्या उपकंपनीला आयडीबीआय बँकेतील ६०.७२ टक्के हिस्सा ५२,८७८ कोटी रुपयांना विकण्यास मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या व्यवहाराला धोरणात्मक निर्गुंतवणुकीऐवजी ‘धोरणात्मक पुनर्रचना’ असे संबोधले होते. या व्यवहारानंतर केंद्र सरकारचा बँकेतील हिस्सा १५ टक्के, तर भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) हिस्सा १९ टक्के राहणार आहे.
