IDBI Bank Strike : सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) विक्रीला केंद्र सरकारने मंजुरी दिला आहे. या निर्णयाला बँक कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. बँकेचे प्रस्तावित खासगीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी देशभरातील १० हजारहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी २ आणि ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दोन दिवसांचा देशभरात लाक्षणिक संप पुकारत आहेत. ‘युनायटेड फोरम ऑफ आयडीबीआय ऑफिसर्स अँड एम्प्लॉईज’ या सर्वसमावेशक संघटनेच्या नेतृत्वात या संपाची हाक देण्यात आली आहे.
सार्वजनिक पैशातून उभारलेली बँक परदेशी हाती का? – कामगार संघटना
कामगार संघटनेने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे, की आयडीबीआय बँकेचे पुनरुज्जीवन हे केवळ परदेशी किंवा खासगी मालकीमुळे झालेले नाही. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील भांडवल आणि कर्मचाऱ्यांचे मेहनत लागली आहे. ऑगस्ट २०१६ ते २०२० या काळात रिझर्व्ह बँकेच्या ॲसेट क्वालिटी रिव्ह्यूमुळे बँकेला मोठा तोटा सहन करावा लागला होता. या कठीण काळात केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाने मिळून ४६,००० कोटी रुपयांहून अधिक निधी बँकेत गुंतवला. कर्मचाऱ्यांनी ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवत बँकेला पुन्हा नफ्यात आणले. असे असताना ही बँक कॅनडाच्या ‘फेअरफॅक्स ग्रुप’सारख्या परदेशी संस्थेच्या हाती सोपवणे हे राष्ट्रीय हिताचे नाही, असा आरोप संघटनेने केला आहे.
आयडीबीआय बँकेची दमदार कामगिरी
संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ६ वर्षांत बँकेने आर्थिक आघाडीवर उत्तम कामगिरी केली आहे. मागील सहा वर्षांत बँकेने ३०,१०६.४३ कोटी रुपयांचा एकूण निव्वळ नफा कमावला आहे. २०१८ मध्ये बँकेचे ग्रॉस एनपीए प्रमाण ३१.७८ टक्के होते, ते घटून आता अवघे २.३० टक्के उरले आहे. एनपीए प्रमाण हे बँकेच्या कर्जाची गुणवत्ता आणि आर्थिक जोखीम किती आहे हे मोजण्यास मदत करते. बँकेचा नेट एनपीए आता केवळ ०.१६ टक्के वर आला आहे. बँकेचे कॅपिटल ॲडिक्वसी रेशिओ २६.३८ टक्के असून, प्रॉव्हिजन कव्हरेज रेशिओ ९९.३१ टक्के इतका मजबूत आहे.
मूल्यांकनावर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
बँकेची आर्थिक स्थिती उत्तम असताना सरकार कमी मूल्यात बँकेची विक्री करत असल्याचा आरोप युनायटेड फोरमने केला आहे. हा संपूर्ण व्यवहार खरेदीदाराच्या फायद्यासाठी केला गेला आहे का? असा संशय व्यक्त करत या विक्री व्यवहाराची स्वतंत्र आणि निष्पक्ष तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संपूर्ण देशातील बँक कर्मचाऱ्यांचा पाठिंबा
आयडीबीआय बँकेच्या या संपाला देशभरातील इतर बँकांच्या कर्मचाऱ्यांची मध्यवर्ती संघटना असलेल्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने (UFBU) पूर्ण पाठिंबा दिला आहे. संपकाळात सर्व बँक कर्मचाऱ्यांना काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
