India GDP Growth IMF intent: युद्धजन्य परिस्थितीत इंधनाचे दर गगनाला भिडलेले असतानाही भारताची अर्थव्यवस्था वाढीच्या मार्गावर कायम असून एप्रिल-जून तिमाहीत जीडीपी ७.८ टक्क्यांनी वाढला आहे. ही वाढ अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचं कौतुक आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) केलं असून सेवा क्षेत्र आणि निर्यातीमधील उत्तम कामगिरीमुळे ही वाढ झाल्याचं म्हटलं आहे.

एका पत्रकार परिषदेत आयएमएफच्या प्रवक्त्या जुली कोझॅक म्हणाल्या, “दुसऱ्या तिमाहीत भारताचा वास्तविक जीडीपी ७.८ टक्क्यांनी वाढला आहे. हा आमच्या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा आणि इतर निरीक्षकांच्या अंदाजापेक्षा अधिक आहे. सेवा क्षेत्र आणि निर्यातीमधील अपेक्षेपेक्षा जास्त वाढीमुळे हा सकारात्मक बदल पाहायला मिळाला आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “हा निकाल इंधनाच्या किमती वाढूनही भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता अधोरेखित करतो. याचा अर्थ असाही होतो की भारत हा जगासाठी आर्थिक वाढीचं एक महत्त्वाचं इंजिन (मुख्य चालक) बनून राहिला आहे.”

एप्रिल-जून या कालावधीतील आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीतील ७.८ टक्के वास्तविक जीडीपी वाढ ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ७ टक्केच्या आधीच्या अंदाजापेक्षा जास्त होती. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या याच कालावधीतील ७५.४६ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत या तिमाहीत वास्तविक जीडीपी ८१.३६ लाख कोटी रुपये झाला आहे.

जीडीपी अंदाज पद्धतीतील बदलांना आयएमएफचा पाठिंबा

भारताच्या आर्थिक वाढीच्या सकारात्मक मूल्यांकनासोबतच, आयएमएफने देशाच्या जीडीपी अंदाज पद्धतीमध्ये केलेल्या बदलांचंही स्वागत केलं आहे. कोझॅक यांनी सांगितलं की, ताज्या जीडीपी आकडेवारीमध्ये नवीन औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) आणि नवीन उत्पादक किंमत निर्देशांक (PPI) मालिका समाविष्ट करण्यात आली आहे. त्यांच्या मते, या दोन्ही गोष्टींमुळे भारताच्या जीडीपी अंदाजांमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल.

“मी असे सांगू शकते की, ताज्या जीडीपी आकडेवारीमध्ये (ज्याबद्दल आपण आत्ता बोललो) नवीन औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि नवीन उत्पादक किंमत निर्देशांक या दोन्ही मालिकांचा समावेश करण्यात आला आहे आणि या दोन नवीन मालिकांमुळे भारताच्या जीडीपी अंदाजांमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल”, असं कोझॅक यांनी म्हटलं. त्या म्हणाल्या की, मॅक्रोइकॉनॉमिक सांख्यिकीचे आधुनिकीकरण करण्यासाठी भारताने घेतलेल्या पुढाकाराचं आयएमएफ स्वागत करते आणि त्यांनी सांख्यिकीय चौकट तसेच डेटाची गुणवत्ता अधिक बळकट करत राहावी यासाठी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले.

जीडीपीच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह

भारताच्या ताज्या जीडीपी आकडेवारीवर आणि त्यामागील सुधारणांवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आयएमएफने ही टिप्पणी केली आहे. माजी वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी एप्रिल-जून तिमाहीतील ७.८ टक्के वाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी मागील वर्षाच्या चालू जीडीपीमध्ये ८६ लाख कोटी रुपयांवरून ८० लाख कोटी रुपयांपर्यंत झालेल्या सुधारणेकडे लक्ष वेधलं होतं. गर्ग यांनी म्हटले होतं की, या सुधारणेव्यतिरिक्त चालू किमतींमधील वाढ साधारण २.६ टक्केच्या आसपास राहिली असती, यामुळे भारताच्या जीडीपी गणनेवर प्रश्न निर्माण होतात. आयएमएफने असंही म्हटलं आहे की, ताज्या आकडेवारीवरून भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता दिसून येते. त्यांनी जीडीपी अंदाज पद्धतीमधील बदलांचं स्वागत केलं आणि नमूद केलं की नवीन औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि उत्पादक किंमत निर्देशांक मालिका जीडीपी अंदाजांमध्ये सुधारणा करण्यास मदत करतील.