E20 Petrol Impact on Cars: देशात ई२० म्हणजेच इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर वाढल्याने, इथेनॉलच्या अतिरिक्त मिश्रणाच्या जुन्या वाहनांवरील परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या (ARAI) एका अहवालात ई१० वाहनांमधील इंधन-प्रणालीच्या रबरी पार्ट्सना संभाव्य धोके असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर ही चिंता अधिकच वाढली आहे.

ई२० पेट्रोलचा वापर सुरू करण्याची शिफारस करणारा, परंतु अद्याप सार्वजनिक न केलेला हा अहवाल, सरकार आणि वाहन उत्पादक या दोघांसाठीही एक महत्त्वाचा संदर्भ ठरला आहे, असे ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिले आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, ई१० पेट्रोलसाठी डिझाइन केलेल्या वाहनांमध्ये ई२० पेट्रोलमुळे होसेस, गॅस्केट्स, सील्स आणि ओ-रिंग्ज यांसारखे रबरी पार्ट्स खराब होऊ शकतात, ज्यामुळे कालांतराने ते बदलावे लागू शकतात.

चारचाकी वाहनांच्या इंजिनच्या टिकाऊपणाची चाचणी करताना असे दिसून आले की, एका BS-IV इंजिनने ई२० पेट्रोलसह समाधानकारक कामगिरी केली. मात्र, एका BS-VI टर्बोचार्ज्ड इंजिनमध्ये २६५ तासांच्या चाचणीनंतर काही समस्या निर्माण झाल्या.

दोन कार उत्पादक कंपन्यांनी घेतलेल्या स्वतंत्र चाचण्यांमध्ये, ४०० तासांनंतर कोणतीही समस्या नसल्याचे सांगितले आणि ई२० पेट्रोलवर इंजिनची कार्यक्षमता समाधानकारक राहिली. पण, दुसऱ्या एका कंपनीने, इंजिनांची एकत्रित ८०९ तासांची चाचणी पूर्ण झाल्यावर एक्झॉस्ट व्हॉल्व्हमध्ये थर्मोमेकॅनिकल बिघाड नोंदवला. जेव्हा दीर्घकाळ अत्यंत उष्णतेच्या संपर्कात राहिल्याने आणि वारंवार येणाऱ्या यांत्रिक ताणामुळे इंजिनचा एक्झॉस्ट व्हॉल्व्ह वाकतो, त्याला तडे जातात किंवा तो तुटतो, तेव्हा त्याला थर्मोमेकॅनिकल बिघाड म्हणतात.

दुचाकी वाहनांवर काय परिणाम?

ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, तीन दुचाकी उत्पादकांनी केलेल्या इंजिन टिकाऊपणा चाचण्यांमध्ये कोणतीही समस्या आढळली नाही आणि ई२० पेट्रोलवर वाहनांची कामगिरी स्वीकारार्ह राहिली.

चाचणी केलेल्या सर्व वाहनांमध्ये, ई२० चा धातूच्या भागांवर कोणताही प्रतिकूल परिणाम दिसून आला नाही, तर टेलपाइपमधून होणारे उत्सर्जन ई१० वाहनांसाठीच्या कायदेशीर मर्यादेत राहिले. या अभ्यासात असेही आढळून आले की, बाष्पीभवन उत्सर्जन, स्टार्टेबिलिटी आणि ड्रायव्हेबिलिटी स्वीकारार्ह मर्यादेत राहिली. पण, ई१० च्या तुलनेत ई२० मुळे पेट्रोल वापरात सुमारे २-६% वाढ झाली. या वाढीचे प्रमाण वाहनांच्या मॉडेलनुसार वेगवेगळे होते.