Crude Oil Price : इराण-इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात महिन्याभरापासून सुरू असलेल्या संघर्षाचे चटके अवघ्या जगाला बसत आहे. जगातील २० टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा ज्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो, ती अक्षरशः ठप्प पडली आहे. परिणामी कच्च्या तेलाचे भाव १२० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणार असून, भारतासारख्या आयातदार देशांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत
जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये लष्करी संघर्ष सुरू झाल्याने हा मार्ग जवळजवळ बंद झाला आहे. जागतिक तेल पुरवठ्याचा मोठा हिस्सा या मार्गावरून जातो. हा मार्ग बंद झाल्यामुळे कच्चे तेल, गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक ठप्प झाली असून, आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मते हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘सप्लाय शॉक’ ठरू शकतो.
१ अब्ज बॅरल पुरवठा प्रभावित होण्याचे संकट
अहवालानुसार, बाजारात सुमारे १ अब्ज बॅरल तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुरवठ्यात मोठी घट झाल्यामुळे आणि मागणी कायम राहिल्याने बाजारपेठेत घबराट पसरली आहे. जर तणाव निवळला नाही, तर कच्चे तेल १३० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
भारतावर काय होणार परिणाम?
भारत आपल्या गरजेच्या ९० टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे भारतासाठी हे मोठे संकट मानले जात आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे देशांतर्गत इंधनाचे दर कडाडू शकतात. परिणामी वाहतूक खर्च वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची भीती आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयावर दबाव वाढून चालू खात्यातील तूट वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
अमेरिकेची आक्रमक रणनीती
अमेरिकेने इराणच्या बंदरांवर नौदलाचा दबाव वाढवला असून तेल टँकर्स रोखण्याची कारवाई तीव्र केली आहे. तसेच मध्यपूर्वेत अत्याधुनिक शस्त्रे पाठवण्याची तयारी अमेरिका करत असल्याने हा संघर्ष लवकर संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन्ही देशांनी चर्चेची तयारी दाखवली असली तरी अद्याप सकारात्मक निर्णय झाला नाही. मध्यपूर्वेतील हा संघर्ष जागतिक अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम करणार असेल, अशी चिंत तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
गुंतवणूकदारांनी काय करावे?
तेल पुरवठ्यातील ही विसंगती केवळ इंधनाचे दर वाढवणार नाही, तर जागतिक शेअर बाजारांवरही मोठा दबाव निर्माण करेल. गुंतवणूकदारांनी आतापासूनच आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऊर्जा क्षेत्रातील बदलांनुसार फेरबदल करणे गरजेचे आहे.
