मुंबई : भारतातील नवउद्यमी अर्थात स्टार्टअप क्षेत्रात वेगाने प्रगती करणाऱ्या आणि भविष्यात युनिकॉर्न होण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांच्या ‘गझेल्स निर्देशांकात’ यंदा ५१ कंपन्यांचा समावेश झाला आहे. २०२१ मध्ये हा निर्देशांक सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३४ गझेल्स कंपन्यांनी युनिकॉर्नचा दर्जा मिळवला आहे. या कंपन्यांनी एकत्रितपणे ६० हजारांहून अधिक रोजगार निर्माण केले असून, त्यांच्या महसुलात २१ टक्के वार्षिक चक्रवाढ दराने वाढ झाली आहे. मात्र, कृत्रिम प्रज्ञा (एआय), क्लीनटेक आणि एरोस्पेस-डिफेन्स यांसारख्या भविष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रांत भारतीय नवउद्यमींची संख्या अमेरिका आणि चीनच्या तुलनेत कमी असल्याचेही या निर्देशांकातून स्पष्ट झाले आहे. ‘२०२६ एएसके प्रायव्हेट वेल्थ हुरुन इंडिया गॅझेल इंडेक्स’च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
‘गझेल्स’ या श्रेणीत ५० कोटी ते एक अब्ज अमेरिकी डॉलर मूल्यांकन असलेल्या आणि पुढील दोन ते तीन वर्षांत युनिकॉर्न होण्याची क्षमता असलेल्या असूचिबद्ध कंपन्यांचा समावेश होतो. तर २० कोटी डॉलर मूल्यांकन असलेल्या आणि पुढील पाच वर्षांत युनिकॉर्न होण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांना ‘चित्ते’ (चीटाज) असे संबोधले जाते. या संकल्पनेनुसार चित्ता कमी अंतरात वेगाने धावतो, तर गझेल अधिक काळ वेग कायम ठेवतो. त्यामुळे दीर्घकालीन वाढीची क्षमता असलेल्या स्टार्टअप्सना गझेल्स श्रेणीत स्थान दिले जाते. या कंपन्या केवळ वेगाने वाढणारे स्टार्टअप्स राहिलेले नसून, त्यांनी प्रत्यक्ष व्यवसाय उभारला आहे. महसूलवाढ, रोजगारनिर्मिती आणि युनिकॉर्न होण्याच्या क्षमतेमुळे भारताच्या पुढील उद्योजकीय विकासात या कंपन्यांची महत्त्वाची भूमिका असेल, असे हुरुन इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद म्हणाले.
एआय क्षेत्रात मोठी मजल मारावी लागणार
जागतिक स्तरावर गझेल्स कंपन्यांच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत ३२, चीनमध्ये ७८, तर भारतात ५१ गझेल्स कंपन्या आहेत. मात्र, क्षेत्रनिहाय वर्गीकरण पाहता भारताला अद्याप मोठी मजल मारायची आहे. भारताच्या गझेल्स यादीत फिनटेक कंपन्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. एआय क्षेत्रात केवळ तीन, क्लीनटेकमध्ये तीन, तर एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात दोन कंपन्यांचा समावेश आहे. याउलट, अमेरिकेत एआय क्षेत्रातील ५४, तर चीनमध्ये २३ गझेल्स कंपन्या आहेत. क्लीनटेक क्षेत्रात अमेरिकेत १४, चीनमध्ये ११ आणि भारतात तीन कंपन्या आहेत. एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात अमेरिकेत ११, चीनमध्ये सात, तर भारतात केवळ दोन कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे एआयवर आधारित मूल्यनिर्मितीच्या क्षेत्रात भारतीय स्टार्टअप परिसंस्थेला मोठी संधी असून, या क्षेत्रात नवोन्मेष आणि गुंतवणूक वाढवण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.
मुंबई तिसऱ्या स्थानी
भारतातील गझेल्स कंपन्यांचे प्रमुख केंद्र म्हणून बंगळुरूचे स्थान कायम आहे. या यादीतील सुमारे १० कंपन्यांची मुख्यालये बंगळुरूमध्ये आहेत. त्यानंतर राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) आणि मुंबईचा क्रमांक लागतो. यंदा गझेल्स निर्देशांकात १५ नव्या कंपन्यांचा समावेश झाला आहे. त्यापैकी नऊ कंपन्यांना चित्ते निर्देशांकातून बढती मिळाली, तर सहा कंपन्यांनी थेट गझेल्स निर्देशांकात प्रवेश केला. या सहा कंपन्या यापूर्वी चित्ते निर्देशांकातही नव्हत्या. दुसरीकडे, गेल्या वर्षीच्या यादीतील ११ कंपन्या बाहेर पडल्या. त्यापैकी सात कंपन्यांनी युनिकॉर्नचा दर्जा मिळवला, दोन कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्या, तर दोन कंपन्यांना निर्देशांकातून वगळण्यात आले. थेट प्रवेश केलेल्या कंपन्यांमध्ये EMA, AI, Unify Apps, Ubiquit आणि Pluro AI यांचा समावेश आहे. तर चित्ते निर्देशांकातून बढती मिळालेल्या कंपन्यांमध्ये Steico, Mosaic Wellness आणि Kuku FM यांचा समावेश आहे.
२०२१ मध्ये पहिल्यांदा हा निर्देशांक प्रसिद्ध झाला, तेव्हा त्यात ३२ कंपन्या होत्या. त्यानंतर ही संख्या ५१ आणि ५२ पर्यंत पोहोचली. सध्या या निर्देशांकात ५१ कंपन्या आहेत. निर्देशांक सुरू झाल्यापासून ३४ गझेल्स कंपन्या युनिकॉर्न झाल्या, तर ५० चित्ते कंपन्यांना गझेल्स श्रेणीत बढती मिळाली आहे. गेल्या वर्षभरात युनिकॉर्न झालेल्या कंपन्यांमध्ये Qure.ai आणि Shadowfax यांचा समावेश असून, या दोन्ही कंपन्या शेअर बाजारातही सूचिबद्ध झाल्या आहेत.
महसुलात २१ टक्के वार्षिक चक्रवाढ वाढ
गझेल्स निर्देशांकातील कंपन्यांच्या एकत्रित महसुलात २०२२ ते २०२५ या कालावधीत २१ टक्के वार्षिक चक्रवाढ दराने वाढ झाली आहे. या विश्लेषणात ५० कंपन्यांचा समावेश आहे. याच कालावधीत निफ्टी कंपन्यांच्या महसुलातील वाढ १३ टक्के होती. भारतातील आघाडीच्या असूचिबद्ध खासगी कंपन्यांच्या महसुलातील तीन वर्षांचा वार्षिक चक्रवाढ दरही १३ टक्के आहे. त्यामुळे महसूलवाढीच्या बाबतीत गझेल्स कंपन्यांनी तुलनेने अधिक वेगाने प्रगती केल्याचे दिसते. भारतातील वेगाने वाढणाऱ्या ५१ स्टार्टअप्सचे एकत्रित मूल्य ३.३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या कंपन्यांचा आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील एकत्रित महसूल ३३,२३३ कोटी रुपये असून, त्यात वार्षिक तुलनेत सरासरी ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. यातील सात स्टार्टअप्सनी एक अब्ज डॉलरचे मूल्यांकन ओलांडत ‘युनिकॉर्न’चा दर्जा मिळवला आहे. महसुलाच्या वर्गवारीनुसार, ११ कंपन्यांचा वार्षिक महसूल एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. १४ कंपन्यांचा महसूल ५०० ते एक हजार कोटी रुपये, तर चार कंपन्यांचा महसूल ३०० ते ५०० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. उर्वरित कंपन्यांचा महसूल ३०० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.
या निर्देशांकातील सुमारे १० कंपन्यांच्या महसुलात जवळपास १२० टक्के वाढ झाली आहे. काही कंपन्यांची वाढ तर लक्षणीय आहे. उदाहरणार्थ, Kratos Greyman Network च्या महसुलात सुमारे दोन हजार टक्के, तर Steico च्या महसुलात जवळपास एक हजार टक्के वाढ झाली आहे. ही आकडेवारी उपलब्ध असलेल्या ताज्या आर्थिक अहवालांवर आधारित आहे.
१५ कंपन्या नफ्यात; एकत्रित नफा १,९०० कोटी रुपये
गझेल्स निर्देशांकातील १५ कंपन्या नफ्यात आहेत. या कंपन्यांचा एकत्रित नफा सुमारे एक हजार ९०० कोटी रुपये आहे. नफ्यात वाढ नोंदवणाऱ्या कंपन्यांमध्ये CreditPe च्या नफ्यात ४० टक्के वाढ झाली आहे. Dun चा नफा ४०८ कोटी रुपये, तर Larron च्या नफ्यात ३४ टक्के वाढ होऊन तो २४८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
महिला सहसंस्थापक असलेल्या सहा कंपन्या
या निर्देशांकातील सहा कंपन्यांमध्ये महिला सहसंस्थापक आहेत. Atlan, Jeeva, InMoney, Kinova Capital, Procap आणि Stat या कंपन्यांचा त्यात समावेश आहे. रोजगारनिर्मितीच्या बाबतीतही या कंपन्यांचे योगदान महत्त्वाचे असून, सर्व कंपन्यांमध्ये मिळून ६० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. संस्थापकांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा विचार करता, आयआयटी खरगपूरमधून सर्वाधिक १३ संस्थापक या यादीत आहेत. पदव्युत्तर शिक्षणाच्या बाबतीत आयआयटी मुंबईचे प्रतिनिधित्व अधिक आहे. Seiko चे संस्थापक जस्ट बापलानी हे ३१ वर्षांचे असून, यादीतील सर्वांत तरुण गझेल्स संस्थापक आहेत.
दोन ते तीन संस्थापक असलेल्या कंपन्यांचे प्रमाण अधिक
कंपन्यांमधील संस्थापकांच्या संख्येचा विचार करता, दोन संस्थापक असलेल्या २० कंपन्या या यादीत आहेत. तीन संस्थापक असलेल्या १८ कंपन्या आहेत. दहा कंपन्या एकाच संस्थापकाने सुरू केल्या आहेत. चार संस्थापक असलेल्या दोन कंपन्या आहेत, तर एका कंपनीचे नऊ संस्थापक आहेत. त्यामुळे दोन किंवा तीन संस्थापकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या कंपन्यांचे या निर्देशांकातील प्रमाण अधिक असल्याचे दिसते.
फिनटेक क्षेत्राचे वर्चस्व
क्षेत्रनिहाय विचार करता, फिनटेक क्षेत्रातील सर्वाधिक १३ स्टार्टअप्सचा या यादीत समावेश आहे. त्यानंतर सॉफ्टवेअर अॅज अ सर्व्हिस (सास) आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील प्रत्येकी पाच, तर एडटेक आणि अॅग्रीटेक क्षेत्रातील प्रत्येकी चार कंपन्यांचा समावेश आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान तसेच एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील आठ कंपन्यांनीही यादीत स्थान मिळवले आहे.
यादीतील कंपन्यांमध्ये कॅप्टन फ्रेशने ३,४६६ कोटी रुपयांचा महसूल नोंदवत आघाडी घेतली. त्यापाठोपाठ देहाट (३,०४१ कोटी रुपये) आणि रेझॉन सोलर (२,८३३ कोटी रुपये) यांचा क्रमांक लागतो. एकूण ११ कंपन्यांनी एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळवला. क्रॅटॉस गेमर नेटवर्कच्या महसुलात सर्वाधिक २,११२ टक्क्यांची वाढ झाली. त्यानंतर सीखो (१,०२१ टक्के) आणि सिंपल एनर्जी (३५७ टक्के) यांचा क्रमांक लागतो.
