V Anantha Nageswaran Health Warning Analysis: देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी म्हटले आहे की, भारतासाठी खरी चिंता ‘श्रीमंत होण्याआधी वृद्ध होणे’ ही नसून ‘श्रीमंत होण्याआधी अस्वस्थ (अनारोगी) होणे’ ही आहे. त्यांनी वाढत्या लठ्ठपणाकडे आणि बैठी जीवनशैलीकडे लक्ष वेधले, ज्यामुळे देशाच्या ‘उत्पादकता लाभांशा’ला (Productivity dividend) धोका निर्माण झाला आहे.
जन्मदर घटणे आणि तरुणांच्या लोकसंख्येचे प्रमाण कमी होणे यामुळे भारत ‘श्रीमंत होण्याआधीच वृद्ध होईल का’, या प्रश्नाला उत्तर देताना नागेश्वरन म्हणाले की, काम करण्यास सक्षम असलेल्या वयोगटातील लोकसंख्या काही काळ वाढतच राहणार आहे, ज्यामुळे भारताला एक संधी मिळणार आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, “आपण श्रीमंत होण्याआधी वृद्ध होत आहोत का, याची चिंता करण्यापेक्षा, आपण श्रीमंत होण्याआधी अस्वस्थ (अनारोगी) होत आहोत का, याचा विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे.”
यावेळी त्यांनी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा दाखला दिला, ज्यानुसार बालमृत्यू, संस्थात्मक प्रसूती आणि मातांच्या आरोग्यात सुधारणा दिसून येते, परंतु “उत्पन्न गट, ग्रामीण किंवा शहरी आणि स्त्री-पुरुष या सर्वांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढली आहे.”
नागेश्वरन यांनी याचे कारण जीवनशैली, बैठी जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, सदोष शहरी रचना आणि रात्री उशिरा जेवणे याला दिले. “शंभरपैकी फक्त ६ भारतीय व्यायाम करतात, हा एक धक्कादायक आकडा आहे”, असे ते म्हणाले.
मुख्य आर्थिक सल्लागारांनी असा युक्तिवाद केला की, शहरी रचना आता सायकलस्वार आणि पादचाऱ्यांऐवजी “वाहनांना अधिक महत्त्व देते”, हा मुद्दा आर्थिक सर्वेक्षणातील शहरीकरणावरील एका विशेष प्रकरणातही समाविष्ट आहे.
विकास दर ठरवण्यात शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व
नागेश्वरन यांनी सांगितले की, आरोग्याकडे आता विकासाचा एक मुख्य घटक म्हणून पाहिले जाते. “गेल्या तीन आर्थिक पाहणी अहवालांवर नजर टाकल्यास, आपल्या विकासाचा दर ठरवण्यात शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व किती आहे, याबद्दल आम्ही भाष्य केले आहे. कारण विकास म्हणजे नक्की काय? तो उत्पादकतेतून येतो आणि जर कामगार मानसिक व शारीरिकदृष्ट्या निरोगी नसतील, तर ते उत्पादक कसे असू शकतील? लोक निरोगी असल्यास कामावरून गैरहजर राहण्याचे प्रमाण आणि अनुत्पादकता कमी होते, तसेच मानसिक आरोग्यासाठी ‘डिजिटल डिटॉक्स’ची गरज असते”, असे ते म्हणाले.
