नवी दिल्ली : सरलेल्या एप्रिलमध्ये देशात, २३,५०६ इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची (ईव्ही) विक्री झाली असून, गेल्या वर्षातील याच महिन्याच्या तुलनेत त्यात ७५.१४ टक्के वाढ नोंदविण्यात आली, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनने (फाडा) बुधवारी दिली.
गेल्या महिन्यात प्रवासी ‘ईव्हीं’च्या विक्रीत टाटा मोटर्सने मोठी आघाडी राखली. टाटा मोटर्सने ८,५४३ वाहनांची विक्री केली गेली. गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत त्यात ७७.१७ टक्के वाढ झाली आहे. त्यानंतर महिंद्र अँड महिंद्र ५,४१३, जेएसडब्ल्यू एमजी मोटार इंडिया ५,००६ अशी विक्री आहे. गेल्या वर्षातील याच महिन्याच्या तुलनेत त्यांच्या विक्रीतील वाढ अनुक्रमे ६३.९८ टक्के आणि ३२.५४ टक्के अशी आहे, असे ‘फाडा’ने म्हटले आहे. एप्रिलमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री १ लाख ४८ हजार ७४० असून, गेल्या वर्षी याच महिन्यात ती ९२ हजार ५३८ होती.
गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ६०.७३ टक्के वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये टीव्हीएस मोटार कंपनी आघाडीवर असून, तिच्या ३७,६८३ दुचाकींची विक्री झाली आहे. त्याखालोखाल बजाज ऑटो ३२,८९८, एथर एनर्जी २७,०३४ अशी विक्री आहे. इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांच्या विक्री गेल्या महिन्यात ६४,५४९ असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ३.३ टक्के वाढ नोंदविण्यात आली. इलेक्ट्रिक वाणिज्यिक वाहनांच्या विक्रीत गेल्या महिन्यात दुप्पट वाढ होऊन ती २,२४५ वर पोहोचली आहे, असे असोसिएशनने नमूद केले आहे.
