India energy security crisis oil import dependence: भारतासमोर केवळ ऊर्जेची समस्या नसून, राष्ट्रीय सुरक्षेचे संकट उभे आहे, असे नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि G20 शेर्पा अमिताभ कांत यांनी म्हटले आहे. भारत आयात केलेल्या कच्च्या तेलावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. ही केवळ एक समस्या नसून, एक संकटच आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारने उचलण्यासारख्या सात उपाययोजनांची यादीही कांत यांनी सादर केली आहे.

अमिताभ कांत यांनी “ऊर्जा स्वातंत्र्य म्हणजे सार्वभौमत्व” असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी सरकार खालील गोष्टी करू शकते असे म्हटले आहे:

  • २०३० पर्यंत नवीकरणीय (Renewables Engergy) ऊर्जा ५०० गिगावॅटवरून १५०० गिगावॅटपर्यंत वाढवणे
  • बॅटरी, पंप्ड हायड्रो, ग्रीन हायड्रोजन यांसराख्या ऊर्जा साठवणुकीला चालना देणे
  • ग्रीन हायड्रोजन निर्यात अर्थव्यवस्था उभारणे
  • इलेक्ट्रिक वाहने आणि ३०% पेक्षा जास्त इथेनॉल मिश्रणाद्वारे कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करणे
  • ग्रीड आणि वहन पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे
  • चीनच्या आयातीवरील अवलंबित्व संपवण्यासाठी देशातच स्वच्छ ऊर्जेचे उत्पादन करणे
  • २४/७ बेसलोड विजेसाठी अणुऊर्जेला गती देणे

‘बिझनेस स्टँडर्ड’साठी लिहिलेल्या एका लेखात, कांत यांनी म्हटले आहे की, हा युद्धकाळ जितका लांबेल, तितकेच भारताचे आयात बिल वाढेल. त्यांनी असेही नमूद केले की, हायड्रोकार्बन्सची आयात करणे म्हणजे भारताने आपल्या अर्थव्यवस्थेला अशा क्षेत्रांशी जोडने होय, ज्यांच्यावर भारताचे नियंत्रण अत्यंत मर्यादित आहे.

“आयातित जीवाश्म (Fossil Fuels) इंधनांवर अवलंबून राहणाऱ्या देशाला, त्या इंधनासोबतच भू-राजकीय जोखीमही सतत आयात करावी लागेल. याउलट, जो देश देशांतर्गत स्वच्छ ऊर्जा, उत्पादन, साठवणूक आणि खनिज प्रक्रिया क्षमता विकसित करेल, तो देश बाह्य धक्क्यांचा सामना करण्यास अधिक सक्षम ठरेल”, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या, मात्र नाजूक अशा युद्धविरामात शुक्रवारी तणावाची चिन्हे दिसून आली. अमेरिकेने इराणवर ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’बाबतच्या आपल्या वचनबद्धतेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला, तर इराणने लेबनॉनवर हल्ला करून इस्रायलने या युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचे म्हटले. इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीची जवळजवळ संपूर्ण नाकेबंदी केली असून, यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यात मोठी बाधा निर्माण झाली आहे.