पीटीआय, नवी दिल्ली
जागतिक आर्थिक अनिश्चितता असूनही, देशाची वस्तू आणि सेवांची निर्यात सरलेल्या २०२५-२६ आर्थिक वर्षात ४.५९ टक्क्यांनी वाढून ८६,३११ कोटी डॉलर या आतापर्यंतच्या उच्चांकावर नोंदवली गेली, असे वाणिज्य मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेकडून बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. आधीच्या २०२४-२५ आर्थिक वर्षात ८२,५२६ कोटी डॉलर निर्यात झाली होती.
गेल्या आर्थिक वर्षात वस्तू निर्यात ०.९३ टक्क्यांनी वाढून ४४,१७८ कोटी डॉलरवर पोहोचली, जी २०२४-२५ मध्ये ४३,७७० कोटी डॉलर इतकी होती. तथापि, यंदा सेवा निर्यातीत सर्वात लक्षणीय वाढ झाली आहे. २०२४-२५ मधील ३८,७५५ कोटी डॉलरच्या तुलनेत, २०२५-२६ मध्ये सेवांची निर्यात ८.७१ टक्क्यांनी वाढून ४२,१३२ कोटी डॉलरच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.
जागतिक अनिश्चितता आणि वस्तूंच्या व्यापारातील आव्हाने असूनही, भारताच्या वस्तू निर्यातीने आपली वाढीची गती कायम राखली असून, एकूण निर्यातीमध्ये सेवांच्या निर्यातीने महत्त्वपूर्ण योगदान दिले, असे वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने ही आकडेवारी जाहीर करताना सांगितले.
सेवा निर्यातीतील मोठी वाढ माहिती-तंत्रज्ञान (आयटी), वाणिज्य उपाययोजना आणि व्यावसायिक कौशल्ये यांसारख्या सेवांना असलेली जागतिक मागणी वाढत असल्याचे अधोरेखित करते, असेही त्या अधिकाऱ्याने पुढे नमूद केले.
प्रत्येक तिमाही सर्वोच्च वाढीची
निर्यातवाढीतील हा टप्पा केवळ त्याच्या विक्रमी मूल्यामुळेच नव्हे, तर सरलेल्या २०२५-२६ या वर्षाच्या चारही तिमाहींमध्ये प्रत्येकी स्वतंत्रपणे निर्यातीची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली गेल्यामुळेही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. देशाच्या व्यापार इतिहासात अशी कामगिरी साध्य होण्याची ही पहिलीच वेळ असून, यातून ‘सेवा निर्यातीतील एक सामर्थ्यवान देश’ म्हणून भारताचे स्थान अधिकच बळकट झाले आहे.
व्यापार तुटीचाही उच्चांक
निर्यातीतील या विक्रमी वाढीसोबतच आयातीतही वाढ झाल्याचे दिसून आले. एकूण आयात (वस्तू आणि सेवा) मागील वर्षातील ९१,९९२ कोटी डॉलरवरून वाढून, २०२५-२६ मध्ये ९७,९६५ कोटी डॉलरवर पोहोचली. एकूण आयातीतील ६.४९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून, आयातीचा हा वाढीचा वेग निर्यातीच्या वाढीपेक्षा अधिक राहिल्यामुळे देशाची एकूण ‘व्यापार तूट’ अधिकच रुंदावत, ११,६५४ कोटींच्या उच्चांकावर पोहोचली आहे. केवळ वस्तूंची आयात ७.४६ टक्क्यांनी वाढून ७७,४९८ कोटी डॉलरवर पोहोचली, तर सेवांची आयात ३ टक्क्यांनी वाढून २०,४६७ कोटी डॉलर झाली आहे.
