मुंबई : भारताच्या परकीय चलनसाठ्यात सरलेल्या आठवड्यात विक्रमी ४४.९० अब्ज डॉलरची वाढ झाली असून, ४ सप्टेंबरअखेर ७८५.७० अब्ज डॉलरच्या नव्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आली.याआधीच्या आठवड्यातही परकीय चलनसाठ्यात ११.४७ अब्ज डॉलरची वाढ झाली होती आणि तो ७४०.८० अब्ज डॉलरवर पोहोचला होता. त्यानंतर अवघ्या आठवडाभरात साठ्यात झालेली जवळपास ४५ अब्ज डॉलरची वाढ ही आतापर्यंतची सर्वाधिक साप्ताहिक वाढ ठरली आहे.

पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यानंतर रुपयावर दबाव वाढला होता. त्यामुळे रुपयाला आधार देण्यासाठी रिझर्व्ह बँकेला परकीय चलन बाजारात डॉलरची विक्री करावी लागली आणि परिणामी देशाच्या परकीय चलनसाठ्यात घट झाली होती. मात्र, जूनमध्ये रिझर्व्ह बँकेने सवलतीच्या दरातील परकीय चलन स्वॅपची योजना जाहीर केल्यानंतर साठ्यात पुन्हा वाढ सुरू झाली. या उपक्रमातून आतापर्यंत १३६ अब्ज डॉलरहून अधिक नवीन निधीचा ओघ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

परकीय चलनसाठ्याचा प्रमुख घटक असलेल्या परकीय चलनमालमत्तेत आठवडाभरात ४७.४९ अब्ज डॉलरची वाढ होऊन ती ६४८.१६ अब्ज डॉलरवर पोहोचली. डॉलरच्या तुलनेत मोजताना परकीय चलनसंपत्तीत युरो, पौंड आणि येन यांसारख्या बिगर-अमेरिकी चलनांच्या मूल्यवाढी-घटीचाही परिणाम समाविष्ट होतो. दरम्यान, सोन्याच्या साठ्याचे मूल्य २.५९ अब्ज डॉलरने घटून ११३.८१ अब्ज डॉलर झाले.

चीन, जपान आणि स्वित्झर्लंडनंतर ७८५ अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी असणारी भारत ही जगातील चौथी अर्थव्यवस्था आहे. बाह्य व्यापार आणि आयातीच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने सध्या आपण सुस्थितीत आहोत, असे रिझर्व्ह बँकेने सांगितले. गंगाजळीने प्रथमच ७८५ अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. वर्ष २०१३ पासून देशाच्या परकीय चलन साठ्यात निरंतर वाढ सुरू आहे. सुदृढ गंगाजळीमुळे अस्थिर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आकस्मिक उद्भवणाऱ्या जोखमींविरूद्ध संरक्षक कवच मिळण्यासह, चलन व्यवस्थापनात रिझर्व्ह बँकेलाही अधिक लवचिकता प्राप्त होते.