मुंबई: भारताचा परकीय चलन साठा २१ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात १२.४२ अब्ज डॉलरने वाढून ७२९.३२ अब्ज डॉलरच्या नवीन उच्चांकावर पोहोचला. त्याआधीच्या आठवड्यात हा साठा ९.९० अब्ज डॉलरने वाढून ७१६.९०७ अब्ज डॉलरवर पोहोचला होता. यापूर्वीचा उच्चांक ७२८.४९ अब्ज डॉलर इतका होता, जो या वर्षी २७ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात – म्हणजेच पश्चिम आशियातील संघर्ष सुरू होण्यापूर्वी गाठला गेला होता.
भू-राजकीय तणावामुळे काही आठवडे या साठ्यात घट झाली होती. कारण रुपयाला सावरण्यासाठी आणि बाजारातील अस्थिरता रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेला डॉलरची विक्री करून परकीय चलन बाजारात हस्तक्षेप करावा लागला होता. मध्यवर्ती बँकेच्या आकडेवारीनुसार, २१ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्याचा मुख्य घटक असलेल्या ‘परकीय चलन मालमत्ते’त ९.४८ अब्ज डॉलरची वाढ होऊन ती ५९१.३३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
देशात अधिक परकीय चलन आकर्षित करण्यासाठी मध्यवर्ती बँक आणि सरकारने गेल्या महिन्यात ‘एफसीएनआर (बी)’ ठेवी मिळविण्यासह अनेक उपाययोजना सुरू केल्या. सवलतीच्या ‘स्वॅप’ उपाययोजनांतर्गत देशाला आतापर्यंत ७२ अब्ज डॉलर मिळाले आहेत. या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य २.८०१ अब्ज डॉलरने वाढून ११४.२१ अब्ज डॉलर झाले, असे रिझर्व्ह बँकेने सांगितले.
