India Forex Reserves : भारताच्या परकीय चलनसाठ्यात २८ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात तब्बल ११.४७ अब्ज डॉलरची भर पडली असून, तो ७४०.८० अब्ज डॉलर या नव्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आली. याआधीच्या आठवड्यातही परकीय चलनसाठ्यात १२.४२ अब्ज डॉलरची वाढ झाली होती आणि तो ७२९.३२८ अब्ज डॉलरवर पोहोचला होता. त्यापूर्वीचा विक्रमी साठा २७ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात ७२८.४९ अब्ज डॉलर होता.

पश्चिम आशियातील संघर्षाला सुरुवात झाल्यानंतर रुपयावर दबाव वाढला होता. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला चलन बाजारात डॉलरची विक्री करून हस्तक्षेप करावा लागला आणि त्याचा परिणाम परकीय चलनसाठ्यावर झाला. मात्र, जूनमध्ये रुपयाच्या तीव्र घसरणीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने सवलतीच्या दरातील परकीय चलन स्वॅप सुविधा सुरू केल्यानंतर साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. या माध्यमातून १३६ अब्ज डॉलरपेक्षा अधिक नव्या निधीचा ओघ झाल्याचे सांगण्यात आले.

परकीय चलनसंपत्तीत ९.३३ अब्ज डॉलरची वाढ

  • परकीय चलनसाठ्यातील सर्वात मोठा घटक असलेल्या फॉरेन करन्सी अॅसेट्समध्ये ९.३३ अब्ज डॉलरची वाढ होऊन ते ६००.६७ अब्ज डॉलर झाले.
  • डॉलरच्या तुलनेत मोजताना परकीय चलनसंपत्तीत युरो, पौंड आणि येन यांसारख्या बिगर-अमेरिकी चलनांच्या मूल्यवाढी-घटीचाही परिणाम समाविष्ट होतो. दरम्यान, भारताच्या सोन्याच्या साठ्याचे मूल्य २.१९ अब्ज डॉलरने वाढून ११६.४० अब्ज डॉलर झाले.

भारत जगात चौथ्या स्थानी

सध्या जगात सर्वाधिक परकीय चलन साठा चीनकडे आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि ताज्या जागतिक आकडेवारीनुसार, चीनचा परकीय चलन साठा सुमारे ३.४१ ट्रिलियन ते ३.५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर (सुमारे ३,४०० अब्ज डॉलर) इतका प्रचंड आहे, जो जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. चीननंतर आशियातील जपानचा नंबर लागतो. जपानकडे १.२५ ट्रिलियन ते १.३८ ट्रिलियन आहे. तिसऱ्या स्थानी स्विट्झर्लंडचा नंबर असून त्यांच्याकडे ९२४ अब्ज ते ९३२ अब्ज डॉलर परकीय गंगाजळी आहे. भारत चौथ्या स्थानी असून ७४० अब्ज डॉलर इतका परकीय चलनसाठा आहे.