मुंबई : जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणाव आणि अनिश्चिततेच्या वातावरणातही भारताची परकी चलन गंगाजळी ६८२.३ अब्ज डॉलरच्या समाधानकारक पातळीवर आहे, जो सुमारे ११ महिन्यांच्या आयातीचा खर्च भागवण्यासाठी पुरेसा आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी सांगितले.

जागतिक आर्थिक अनिश्चितता, पश्चिम आशियातील संघर्ष आणि वाढत्या ऊर्जा किमतींच्या पार्श्वभूमीवर परकी चलनसाठा मजबूत स्थितीत असल्याचा विश्वास रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला. बाह्य कर्जाच्या तुलनेतही हा साठा भक्कम असून तो देशाच्या एकूण बाह्य कर्जाच्या ८९.१ टक्के आहे.

गेल्या आठवड्यात परकीय चलनसाठ्यात ७.५ अब्ज डॉलरची घट होऊन तो ६८१.३ अब्ज डॉलरवर आला होता. यापूर्वी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी तो विक्रमी ७२८.५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला होता. मात्र, पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र झाल्यानंतर रुपयावर दबाव वाढला आणि चलन बाजारात स्थैर्य राखण्यासाठी रिझर्व्ह बँकेला डॉलरची विक्री करावी लागल्याने साठ्यात घट झाली.

बाह्य धक्क्यांशी दोन हात करण्यास सक्षम

परकी चलनसाठा हा बाह्य आर्थिक धक्क्यांपासून संरक्षण देणारे कवच म्हणू कार्य करते. मात्र, आवश्यकतेनुसार बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडे विविध नियामक आणि बाजाराधारित साधने उपलब्ध आहेत. चलन बाजारातील शिस्तबद्ध व्यवहार कायम ठेवण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते करण्यास पूर्णपणे सज्ज आहोत, असे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.

चालू खात्यातील तुटीवर दबाव

वाढत्या ऊर्जा किमती आणि जागतिक व्यापार धोरणांतील अनिश्चितता यामुळे २०२६-२७ मध्ये चालू खात्यातील तुटीवर दबाव वाढू शकतो. तथापि, सेवा क्षेत्रातील निर्यातीतून मिळणारा अधिशेष आणि परदेशातून येणाऱ्या रकमा (रेमिटन्स) यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे, असे रिझर्व्ह बँकेने इशारा दिला आहे.