मुंबई: अशक्त झालेल्या रुपयाला सावरण्यासाठी डॉलर खर्ची घालून देखील, देशाच्या परकीय गंगाजळीत एप्रिल-डिसेंबर २०२५ या कालावधीत १९.४ अब्ज डॉलरची भर पडली, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली. आधीच्या वर्षात, एप्रिल ते डिसेंबर २०२४ मध्ये गंगाजळीत १०.७ अब्ज डॉलरची घट झाली होती.
व्यवहारतोल अर्थात बॅलन्स ऑफ पेमेंट्सच्या आधारावर मूल्यांकन परिणाम वगळता, एप्रिल ते डिसेंबर २०२५ दरम्यान परकीय चलन साठ्यात ३०.८ अब्ज डॉलरची घट झाली. आधीच्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर दरम्यान ही घट १३.८ अब्ज डॉलरची होती. प्रामुख्याने सोन्याच्या उच्च किंमती, प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलरचे अवमूल्यन याच्या परिणामी मूल्यांकन लाभही गंगाजळीला झाला. तो एप्रिल ते डिसेंबर २०२५ दरम्यान ५०.२ अब्ज डॉलरचा राहिला, तर आधीचा वर्षी हा लाभ फक्त ३.१ अब्ज डॉलर इतका होता.
चालू खात्यावरील तूट ही एप्रिल ते डिसेंबर २०२५ दरम्यान ३०.२ अब्ज डॉलरची नोंदवली गेली, तर एप्रिल ते डिसेंबर २०२४ दरम्यान ती तूट यापेक्षा जास्त ३६.७ अब्ज डॉलरची होती.
